Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘सेवा संकल्प अभियाना’तून राज्यभर सर्वसमावेशक आरोग्य तपासणी; ॲनिमिया निर्मूलनावर विशेष भर

गर्भवती महिला, बालके, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम; १,४४० डॉक्टरांच्या भरतीसह १५ हजार आरोग्य समित्यांच्या माध्यमातून अभियान राबविण्याचे निर्देश

मुंबई : ‘सेवा संकल्प अभियानाच्या’ माध्यमातून राज्यातील नागरिकांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी, ॲनिमिया निर्मूलन, बाल आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्यसेवा तसेच शालेय विद्यार्थ्यांची तपासणी आणि उपचारांचा पाठपुरावा करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य संस्थांमधील सेवांचे नियमित संनियंत्रण, जनआरोग्य समित्यांचा सहभाग, रुग्णवाहिका सेवेचे बळकटीकरण आणि वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता यावर विशेष भर देण्याचेही त्यांनी सांगितले.

आरोग्यभवन येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंत्री आबिटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्यसेवा आयुक्त डॉ. संजय काटकर आणि नागरी सेवा आयुक्त डॉ. सुनील भाकरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

निमिया निर्मूलनासाठी विशेष मोहीम

राज्यातील ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी तपासणी, उपचार आणि नियमित संनियंत्रणावर आधारित विशेष अभियान राबवावे. गर्भवती महिला, शून्य ते दोन वर्षे वयोगटातील बालके, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीला प्राधान्य द्यावे. यासाठी सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास आणि आदिवासी विकास विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.

ॲनिमियाची स्थिती, लोहयुक्त औषधांचा पुरवठा, रुग्णांकडून औषधांचे सेवन आणि उपचारानंतरची प्रगती यांचे आरोग्य संस्थानिहाय संनियंत्रण करावे. मध्यम आणि तीव्र ॲनिमियाने ग्रस्त गर्भवती महिलांसाठी ‘फेरिक कार्बोक्सिमाल्टोज’ उपचाराच्या वापराबाबत तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रमाणित मार्गदर्शक सूचना तयार करण्याचा प्रस्ताव सादर करावा. उपचारांसोबत पोषणविषयक मार्गदर्शन आणि नियमित हिमोग्लोबिन तपासणीवरही भर द्यावा, असे आबिटकर यांनी सांगितले.

हेही वाचा –  सिंधुदुर्गच्या आरोग्य व्यवस्थेला मिळणार बळ; रिक्त पदांसह प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

,४४० डॉक्टरांच्या भरतीवर भर

आरोग्य सेवेत मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी राज्यात १,४४० डॉक्टरांची भरती करण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी १५ हजार जनआरोग्य समित्यांच्या माध्यमातून आरोग्य अभियान राबवावे, असेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

शून्य ते दोन वर्षांच्या बालकांवर विशेष लक्ष

बालकांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ मोठ्या प्रमाणात शून्य ते दोन वर्षांच्या कालावधीत होत असल्याने या वयोगटासाठी विशेष कृती आराखडा तयार करावा. कुपोषण, ॲनिमिया आणि जन्मजात आजारांचे लवकर निदान करून तत्काळ उपचार सुरू करावेत. पोषण पुनर्वसन केंद्रांशी समन्वय साधून उपचारासाठी निश्चित केलेल्या प्रत्येक बालकाचा नियमित पाठपुरावा करावा.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तपासणीत आढळलेल्या बालकांवर शंभर टक्के उपचार पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची नियोजित वेळेत आरोग्य तपासणी पूर्ण करावी. अंगणवाडी आणि शाळांमधील तपासणीची माहिती डिजिटल प्रणालीवर नोंदवून उपचार पूर्ण होईपर्यंत प्रत्येक बालकाचा मागोवा घ्यावा.

ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिरे

६० वर्षांवरील नागरिकांची रक्तदाब, मधुमेह, दृष्टी, श्रवण, अस्थिरोग, मानसिक आरोग्य आणि वयोमानानुसार उद्भवणाऱ्या आजारांसाठी तपासणी करावी. प्रत्येक आयुष्मान आरोग्य मंदिरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करावीत. गरजेनुसार त्यांना जेरियाट्रिक आणि पॅलिएटिव्ह केअर सेवांशी जोडण्यात यावे.

उच्च रक्तदाबाचे निदान झाल्यानंतरही उपचार सुरू न केलेल्या नागरिकांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांना उपचार व्यवस्थेशी जोडावे. आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक ॲलोपॅथी, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधांची उपलब्धता सुनिश्चित करावी, असेही निर्देश देण्यात आले.

आरोग्य सेवांसाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष

राज्यातील आरोग्य संस्थांमधील रुग्णसेवांचे प्रत्यक्ष वेळेत संनियंत्रण करण्यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा. रुग्ण नोंदणी कक्ष, बाह्यरुग्ण विभाग आणि अपघात विभाग यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचे नियमित निरीक्षण करावे. डिजिटल साधनांच्या माध्यमातून विविध श्रेणीतील आरोग्य संस्थांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

१०८रुग्णवाहिका सेवेला बळकटी

आपत्कालीन ‘१०८’ रुग्णवाहिका सेवेसाठी ३५२ अत्याधुनिक नवीन वाहने पहिल्या टप्प्यात कार्यान्वित करावीत. प्रत्येक वाहनातील आधुनिक रुग्णसेवा प्रणालीचा प्रभावी वापर नागरिकांना मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक जनजागृती करावी.

आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये आरोग्य अधिकारी व तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात. नियुक्त तज्ज्ञ डॉक्टर प्रत्यक्ष सेवेत रुजू होतील, याची खात्री करावी. महानगरपालिका क्षेत्रातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदे भरण्याची कार्यवाहीही गतिमान करावी, असे आबिटकर यांनी सांगितले.

डिजिटल सेवा नोंदींवर भर

आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा नोंदी अद्ययावत करण्यासाठी डिजिटल प्रणाली अधिक सक्षम करावी. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी स्वतःच्या सेवा नोंदी अद्ययावत ठेवण्यासाठी जबाबदार असेल, अशी कार्यपद्धती निश्चित करावी. पदस्थापना आणि प्रशासकीय निर्णयांसाठी प्रमाणित डिजिटल माहितीचा वापर करण्यात यावा, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button