वाचनाच्या ज्ञानदीपाने उजळला गणेशोत्सव! मोशीतील गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलचा ‘ग्रंथसंपदा’ उपक्रम

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी –
गणेशोत्सवाच्या पारंपरिक भक्तीला ज्ञान, संस्कार आणि वाचनसंस्कृतीची जोड देत मोशी येथील गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यंदाचा गणेशोत्सव ‘ग्रंथसंपदा’ या आगळ्यावेगळ्या आणि ज्ञानवर्धक संकल्पनेवर उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेने विद्यार्थी, पालक आणि समाजापुढे एक प्रेरणादायी सामाजिक संदेश ठेवला आहे.
स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. विनायक भोंगाळे यांनी या प्रसंगी सांगितले की, “‘ग्रंथसंपदा’ ही केवळ पुस्तकांची संग्रहित संपत्ती नसून समाजाच्या बौद्धिक, सांस्कृतिक आणि नैतिक विकासाचा अमूल्य ठेवा आहे. पुस्तके माणसाला विचार करायला शिकवतात, ज्ञानाची क्षितिजे विस्तारतात आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित करतात.” याच विचारांना केंद्रस्थानी ठेवून गणेशोत्सवाची विशेष सजावट आणि मांडणी करण्यात आली आहे.
गणपती बाप्पाला बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. याच भावनेतून ‘वाचाल तर वाचाल, वाचनातून घडाल आणि ज्ञानातून समाज घडवाल’ हा संदेश देत भक्ती आणि ज्ञानाचा सुंदर संगम या ठिकाणी साधण्यात आला आहे.
मान्यवरांची उपस्थिती
हेही वाचा – राज्यात दुष्काळाचं सावट; पालकमंत्र्यांना शेतात जाण्याचे आदेश, नुकसानीचा अहवाल मागवला

या ज्ञानमय सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक भोंगाळे, नगरसेविका कविताताई भोंगाळे पाटील, खजिनदार सौ. विजया भोंगाळे, विश्वस्त सौ. सरिता विखे पाटील, योगेश एंटरप्राइजेसचे व्यवस्थापकीय संचालक श्री. योगेश भोंगाळे, विपणन अधिकारी श्री. शैलेंद्र सिंग, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच सर्व पालक प्रतिनिधी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांनी आणि पालकांनी गणरायाच्या भक्तीसोबतच वाचनसंस्कृती जपणाऱ्या या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. ज्ञान, भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा हा मिलाफ उपस्थितांच्या मनात घर करून गेला आहे.





