Women’s Asian Games 2026: भारतीय संघाची उपांत्य फेरीत धडक; जपानचा ८ गडी राखून धुव्वा

Women’s Asian Games 2026 | महिला आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने अपेक्षेप्रमाणे जोरदार मुसंडी मारत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. गुरुवारी करोगी स्पोर्ट्स पार्क येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाने यजमान जपानवर ८ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानंतर शेफाली वर्माच्या १५ चेंडूंतील तुफानी नाबाद ४० धावांमुळे भारताने विजयासाठीचे ५८ धावांचे माफक आव्हान अवघ्या ५ षटकांत (३० चेंडूंत) लिलया पार केले.
नाणेफेक जिंकून भारताने जपानला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. जपानने ६ षटकांत बिनबाद २४ धावा करत सावध सुरुवात केली होती. मात्र, सातव्या षटकापासून भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली. श्री चरणीने घातक गोलंदाजी करत ४ षटकांत केवळ १० धावा देऊन ४ गडी बाद केले. तिला उत्तम साथ देत शेफाली वर्माने १३ धावांत २ बळी टिपले. त्यामुळे जपानचा संपूर्ण संघ ५७ धावांवर सर्वबाद झाला.
हेही वाचा
गणेशम-२ सोसायटीतील आगीत नाना काटेंची तत्परता; दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका
५८ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळती झाली. सलामीवीर गुणलन कमलिनी भोपळाही न फोडता बाद झाली, तर भारती फूलमाली अवघ्या ६ धावा करून माघारी परतली. मात्र, त्यानंतर सलामीवीर शेफाली वर्माने मैदानात तुफान फटकेबाजी करत १५ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४० धावा कुटल्या. रिचा घोषने नाबाद १२ धावा करत तिला उत्तम साथ दिली. या जोडीने अवघ्या ३० चेंडूंत ५८ धावा पूर्ण करून भारताला सहज विजय मिळवून दिला.
उपांत्य फेरीत भारताचा सामना बांगलादेशशी
गतविजेत्या भारतीय महिला संघाचा उपांत्य फेरीत मुकाबला आता शनिवारी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. पावसामुळे चीनविरुद्धचा सामना रद्द झाल्याने चांगल्या क्रमवारीच्या बळावर बांगलादेशने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंका आमनेसामने असतील. उपांत्य फेरीतील विजयी संघ २२ सप्टेंबर रोजी सुवर्णपदकासाठी, तर पराभूत संघ कांस्यपदकासाठी भिडतील.





