शिवसेना नाव-चिन्हाच्या वादावर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी; शिंदे गटाचा युक्तिवाद निर्णायक टप्प्यात
‘फूट केवळ विधिमंडळ पक्षात नव्हे, संघटनेतही’; नीरज कौल यांचा युक्तिवाद, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाचे आव्हान

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणत्या गटाला मिळावे, यावरून सुरू झालेला कायदेशीर वाद आता सर्वोच्च न्यायालयात निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवसेना हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला दिले होते. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
या प्रकरणावर १५ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला पुन्हा सुरुवात झाली. शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे समर्थन केले. आयोगाला पक्षाची घटना, संघटनात्मक रचना आणि पक्षातील स्थितीचा विचार करून कोणता गट पक्षाचे प्रतिनिधित्व करतो, हे ठरवण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.
हेही वाचा – गौण खनिज प्रशासनात डिजिटल क्रांती; ‘महाखनिज २.०’चे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण
‘फूट केवळ विधिमंडळ पक्षात नव्हती’
ठाकरे गटाच्या युक्तिवादानुसार, २०२२ मधील वाद हा मुख्यत्वे विधिमंडळ पक्षातील फुटीशी संबंधित होता. त्याला उत्तर देताना कौल यांनी फूट केवळ विधिमंडळ पक्षापुरती मर्यादित नव्हती, तर तिचा परिणाम राजकीय पक्षाच्या संघटनेत आणि कार्यकर्त्यांमध्येही दिसून आला, असा युक्तिवाद केला. त्यामुळे निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्ह आदेशाच्या परिच्छेद १५ अंतर्गत निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी मांडले.
आजच्या सुनावणीकडे लक्ष
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी आज, १६ सप्टेंबर रोजीही सुरू राहण्याची नोंद आहे. या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या निर्णयाची कायदेशीर वैधता, पक्षाची संघटनात्मक रचना आणि ‘खरी शिवसेना’ ठरवताना कोणते निकष लागू होतात, हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीत शिंदे गटाच्या पुढील युक्तिवादासह न्यायालयाकडून होणाऱ्या निरीक्षणांकडे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





