आर. के. एल. गॅलक्सी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘शाडू माती गणेश मूर्ती’ कार्यशाळा; १०० हून अधिक पालकांनी साकारल्या इको-फ्रेंडली मूर्ती

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
आर. के. एल. गॅलक्सी इंटरनॅशनल स्कूल (वडमुखवाडी, आळंदी रस्ता) येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्याच्या उद्देशाने ‘शाडू माती गणेश मूर्ती निर्मिती’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे १०० हून अधिक पालकांनी आपल्या मुलांसोबत प्रत्यक्ष उपस्थित राहून पर्यावरणाचा समतोल राखणारा हा उपक्रम यशस्वी केला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (PoP) मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी आणि नैसर्गिक शाडू मातीच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. कार्यशाळेत तज्ज्ञ कलाशिक्षकांनी अत्यंत सोप्या पद्धतीने शाडू मातीपासून आकर्षक व इको-फ्रेंडली गणपती बाप्पाची मूर्ती कशी तयार करावी, याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन उपस्थितांना दिले.
हेही वाचा – शिवसेना नाव-चिन्हाच्या वादावर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी; शिंदे गटाचा युक्तिवाद निर्णायक टप्प्यात
या उपक्रमात पालकांनी आपल्या पाल्यांसह अगदी उत्साहाने सहभाग घेतला. स्वतःच्या हाताने बाप्पाची मूर्ती साकारताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि कौतुक पाहायला मिळाले. “शाळेचा हा उपक्रम केवळ सर्जनशीलतेला वाव देणारा नसून, मुलांमध्ये बालपणापासूनच पर्यावरण रक्षणाची व संस्कृतीची आवड निर्माण करणारा आहे,” अशी भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केली.
शाळेच्या व्यवस्थापनाने व प्राचार्यांनी सहभागी सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. निसर्गाचे रक्षण ही काळाची गरज असून, या वर्षी घराघरांत स्वतः तयार केलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्तींचीच स्थापना करून ‘इको-फ्रेंडली गणेशोत्सव’ साजरा करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. संपूर्ण कार्यशाळा अतिशय उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडली.





