TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘ओबीसींचे आरक्षण संपले’; मनोज जरांगे आणि सरकारवर लक्ष्मण हाकेंचा घणाघात

“ओबीसींच्या लेकरांचा बळी देऊन लढा जिंकायचा आहे का?”; सरकारच्या भूमिकेवरही हाकेंचा सवाल

सांगली : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले असताना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. “ओबीसींचे आरक्षण संपले आहे, हा माझा दावा आहे,” असे हाके यांनी सांगितले.

सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत हाके यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर भूमिका मांडली. मागासवर्गीय समाजातील लोकांचे दाखले काढले जात असून ओबीसी समाज असंघटित असल्याने केवळ मतांसाठी त्याचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने जरांगे यांच्या मागण्यांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसी आरक्षणाच्या हक्कांवर परिणाम होण्याची भीती असल्याचेही हाके यांनी म्हटले.

“मंत्र्यांनी जरांगे पाटील यांची वारंवार भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाचे बळ वाढवले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री दिशाभूल करत आहेत,” असा आरोप हाके यांनी केला. यापूर्वीही हाके यांनी सरकारच्या काही निर्णयांमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येत असल्याचा दावा केला होता.

हेही वाचा –  Nighttime Light Exposure : झोपताना मंद प्रकाशही हृदयासाठी ठरू शकतो धोकादायक; नव्या अभ्यासातून महत्त्वाचा इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टीका करताना हाके यांनी, “जरांगे, तुमचा लढा मराठा समाजातील गोरगरीब लेकरांसाठी आहे. मात्र, ओबीसींच्या लेकराबाळांचा बळी देऊन तुम्हाला हा लढा जिंकायचा आहे का?” असा सवाल केला.

खासदार विशाल पाटील यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्याचा दावाही हाके यांनी केला. तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न धनगर समाजानेच पुढे न्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

“ओबीसी समाज एकत्र आला, तर अनेकांचे डिपॉझिट जप्त होईल. वेळ पडली तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू,” असा इशाराही हाके यांनी दिला. तसेच देशातील राजकीय व्यवस्थेतील बदल, डिलिमिटेशन आणि इतर मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केले.

दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जरांगे यांच्या मान्य झालेल्या मागण्या सरकारने सार्वजनिक कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागण्यांचा ओबीसी समाजाच्या हितावर परिणाम होत नसेल, तर त्या जाहीर करण्यास सरकारने पुढाकार घ्यावा, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच केली आहे. त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी कार्यकर्त्यांनीही सरकारच्या भूमिकेवर लक्ष ठेवण्याची भूमिका घेतली असून, जरांगेंना मुंबईत आंदोलनाची परवानगी मिळाल्यास प्रतिआंदोलनाची रणनीती आखण्याचा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button