काश्मिरींना तुरुंगात टाकायचं आहे का? ‘वंदे मातरम्’वरून ओमर अब्दुल्लांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Omar Abdullah | ‘वंदे मातरम्’च्या संपूर्ण गायनावरून जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. “काँग्रेसला नक्की काय हवे आहे? वंदे मातरम् न म्हटल्यामुळे काश्मिरी जनतेला तुरुंगात टाकायचे आहे का?” असा संतप्त सवाल ओमर अब्दुल्ला यांनी गुरुवारी श्रीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. ‘वंदे मातरम्’चे संपूर्ण गायन करणे हे आता कायदेशीर बंधन असल्याचे स्पष्ट करत त्यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला.
ओमर अब्दुल्ला म्हणाले की, जर काँग्रेसचा या कायद्याला विरोध होता, तर त्यांनी तो संसदेत मंजूर होतानाच रोखायला हवा होता. आता कायदा अस्तित्वात आल्यानंतर त्याचे पालन करणे ही कायदेशीर जबाबदारी बनते. राष्ट्रगीत गायले जाते अशा सर्व अधिकृत ठिकाणी ‘वंदे मातरम्’चे संपूर्ण गायन करणे कायद्याने बंधनकारक आहे. हा नियम केवळ जम्मू-काश्मीरपुरता मर्यादित नसून संपूर्ण देशाला लागू आहे. त्यामुळे काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमधील सरकारी कार्यक्रमांमध्येही या नियमाचे पालन करावेच लागेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
हेही वाचा
भारताची आशिया चषकाच्या फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री! बांगलादेशवर ४० धावांनी मात
विवादाची नेमकी पार्श्वभूमी
जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या उपस्थितीत ‘वंदे मातरम्’चे संपूर्ण गायन करण्यात आले होते. यावरून काँग्रेसने आक्षेप नोंदवला. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी नॅशनल कॉन्फरन्सला केवळ पहिली दोन कडवी गाण्याचे आवाहन केले होते. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद आणि रवींद्रनाथ टागोरांच्या विचारांचा दाखला देत स्वातंत्र्यसैनिकांच्या ऐतिहासिक भूमिकेचा आदर करावा, असे वेणुगोपाल म्हणाले होते. त्यावर आता ओमर अब्दुल्ला यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे.





