भारताची आशिया चषकाच्या फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री! बांगलादेशवर ४० धावांनी मात

Womens Asia Cup 2026 | महिला आशिया चषक २०२६ स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत (सेमीफायनल) भारतीय महिला संघाने दर्जेदार कामगिरी करत बांगलादेशचा ४० धावांनी धुव्वा उडवला आणि दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. सलामीवीर शफाली वर्माचे शानदार अर्धशतक आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्याच्या जोरावर भारताने हा विजय साकारला. आता १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महाअंतिम सामन्यात भारतीय संघ जेतेपदासाठी मैदानात उतरेल.
शफाली वर्माची ६४ धावांची खेळी
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली; उपकर्णधार स्मृती मानधना अवघ्या २ धावांवर बाद झाली. मात्र, त्यानंतर शफाली वर्माने आक्रमक पवित्रा घेत बांगलादेशी गोलंदाजांवर हल्ला चढवला. तिने ६४ धावांची तुफानी खेळी केली, तर प्रतिका रावलने २० धावा करत तिला उत्तम साथ दिली. अखेरच्या षटकांमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौर (२४ धावा), ऋचा घोष (२१ धावा) आणि दीप्ती शर्माने (नाबाद १३ धावा) फटकेबाजी करत निर्धारित २० षटकांत भारताची धावसंख्या १४९ धावांपर्यंत नेली.
हेही वाचा
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहनांना आजपासून बंदी!
Marching into the Final! 🇮🇳
A dominant display by #TeamIndia as they win by 4️⃣0️⃣ runs to seal their spot in the Final of the #WomensAsiaCup 🥳
Scorecard ▶️ https://t.co/6OyMx9q1ih#INDvBAN pic.twitter.com/MtVYlVDv8n
— BCCI Women (@BCCIWomen) September 10, 2026
बांगलादेशचा डाव १०९ धावांवर रोखला
विजयासाठी मिळालेल्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजीसमोर मोकळेपणाने खेळताच आले नाही. दिलारा अख्तर (२१ धावा), कर्णधार निगार सुलताना (१९ धावा), शोभना मोस्तारी (१८ धावा) आणि जुआइरिया फर्दूस (१४ धावा) यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. ठरावीक अंतराने विकेट्स गमावल्यामुळे बांगलादेशला २० षटकांत केवळ १०९ धावांपर्यंतच मजल मारता आली आणि भारताने ४० धावांनी दणदणीत विजय मिळवला.
रविवारी रंगणार अंतिम सामना
या दिमाखदार विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा आशिया चषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार असून, या लढतीतील विजेता संघ रविवार, १३ सप्टेंबर रोजी जेतेपदासाठी भारताशी भिडणार आहे.





