TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

गणेशोत्सवाआधी पुण्यात FDAची मोठी कारवाई; चार ट्रक पनीर-खवा जप्त

पेठ परिसरातील कारवाईने खळबळ; जप्त खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत, अहवालानंतर पुढील कारवाई

पुणे : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अन्न व औषध प्रशासनाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. बुधवारी पेठ परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल चार ट्रक पनीर आणि खव्याचा साठा जप्त करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांचा साठा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मोठ्या प्रमाणातील साठा असल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. जप्त करण्यात आलेल्या पनीर आणि खव्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

प्रयोगशाळेतील तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तोपर्यंत जप्त केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम

महाराष्ट्र FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर भेसळखोरांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम राबविण्यात येत आहे. पुण्यातील ही कारवाई त्याच मोहिमेचा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

गणेशोत्सव तसेच आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे. भंडारा, महाप्रसाद किंवा सामूहिक अन्नवाटपाचे आयोजन करणाऱ्यांसाठीही प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

हेही वाचा –  प्रियदर्शनी स्कूल, मोशीच्या विद्यार्थिनीचे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत उल्लेखनीय यश

अन्नवाटपापूर्वी ७ दिवस आधी पूर्वसूचना आवश्यक

सामूहिक अन्नवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी किमान सात दिवस अगोदर अन्न व औषध प्रशासनाला पूर्वसूचना देणे आवश्यक करण्यात आले आहे.

मिठाई विक्रेत्यांना खवा आणि पनीर खरेदीची मूळ बिले जतन करणे बंधनकारक आहे. खाद्यपदार्थांवर एक्सपायरी डेट तसेच ‘बेस्ट बिफोर’ची माहिती असलेले लेबल असणेही आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचे नियम पाळणे बंधनकारक

सणासुदीच्या काळात अन्न व्यवसाय चालकांनी स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. सुरक्षित पाण्याचा वापर, अन्न योग्य तापमानावर ठेवणे, कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवणे, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि खाद्यपदार्थांची सुरक्षित साठवणूक याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना आहेत.

पुण्यातील या कारवाईनंतर आता जप्त पनीर आणि खव्याच्या प्रयोगशाळा अहवालाकडे लक्ष लागले आहे. अहवालाच्या निष्कर्षानुसार संबंधितांवर पुढील कोणती कारवाई केली जाते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button