सायबर फसवणूक होताच ‘1930’ वर तातडीने संपर्क करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे नागरिकांना आवाहन
‘डिजिटल अरेस्ट’ जनजागृती लघुपट आणि ‘1930 महाराष्ट्र सायबर अँथम’चे लोकार्पण; एआय, डीपफेक आणि व्हॉईस क्लोनिंगच्या नव्या आव्हानांबाबतही सतर्कतेचा इशारा

मुंबई : पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीश असल्याचे भासवून नागरिकांना भीती दाखवत सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक केली जात आहे. त्यामुळे अशा कोणत्याही दबावाला किंवा धमकीला बळी पडू नये आणि सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तातडीने ‘1930’ या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र सायबरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘डिजिटल अरेस्ट’ या सायबर जनजागृती लघुपटाचे तसेच ‘1930 महाराष्ट्र सायबर अँथम’चे लोकार्पण करण्यात आले.
सायबर फसवणूक झाल्यानंतरचा सुरुवातीचा काळ अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या कालावधीत तक्रार नोंदविल्यास फसवणुकीची रक्कम रोखण्याची किंवा ती परत मिळविण्याची शक्यता अधिक असते.
मात्र, नागरिकांनी तीन ते पंधरा दिवस उशिरा तक्रार केल्यास संबंधित रक्कम अनेक बँक खात्यांमधून वळविली जाते. त्यामुळे पैशांचा मागोवा घेणे आणि रक्कम परत मिळविणे अत्यंत कठीण होते. त्यामुळे फसवणूक लक्षात येताच विलंब न करता 1930 वर संपर्क साधणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सायबर गुन्हेगार पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगणे, ओटीपी फ्रॉड, बनावट फोन कॉल तसेच पोलीस किंवा सीबीआयच्या नावाने धमकावणे अशा विविध क्लृप्त्यांचा वापर करतात. अनेकदा स्क्रीनवर खाकी वर्दीतील व्यक्ती किंवा न्यायाधीशांचे रूप दाखवून नागरिकांना घाबरविले जाते आणि त्यातून आर्थिक फसवणूक केली जाते.
हेही वाचा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्यासोबत अनोखे रक्षाबंधन; लोकभवनात महिलांनी बांधली राखी
अशा प्रकारच्या तथाकथित **‘डिजिटल अरेस्ट’**च्या धमक्यांना घाबरून कोणतीही रक्कम पाठवू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे व्हॉईस क्लोनिंग, डीपफेक तसेच बनावट ऑडिओ आणि व्हिडिओ तयार करण्याचे नवे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी डिजिटल माध्यमांवर मिळणाऱ्या माहितीची सत्यता तपासणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
सायबर गुन्हे रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबतच व्यापक जनजागृती करणे हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला लघुपट आणि सायबर अँथममध्ये योगदान देणारे कलाकार आशिष विद्यार्थी, पंकज त्रिपाठी, शरद केळकर, सोनाली बेंद्रे, जावेद जाफरी, गायिका सुनिधी चौहान, अभिषेक बॅनर्जी, मंगेश देसाई आणि समय रैना आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध कलाकारांच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचा संदेश अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, महाराष्ट्र सायबर सेलचे प्रमुख यशस्वी यादव यांनी भविष्यातील ‘महाराष्ट्र सायबर सेफ ॲप’ आणि ‘आशा कॉल बॉट’ या प्रकल्पांची माहितीही सादर केली.





