Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

आदिवासींचे वनहक्क प्रश्न आता कालबद्ध पद्धतीने निकाली काढणार; ‘सेवा संकल्प अभियान’ १७ सप्टेंबरपासून

पात्र लाभार्थ्यांना वनहक्कपट्टे, ७/१२ आणि प्रॉपर्टी कार्ड देण्यावर भर; आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची २८ सप्टेंबरला आरोग्य तपासणी

मुंबई : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत आदिवासी बांधवांचे वनहक्कविषयक प्रलंबित प्रश्न प्राधान्याने आणि कालबद्ध पद्धतीने निकाली काढावेत, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक वुईके यांच्या समिती कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

अभियानाच्या कालावधीत पात्र आदिवासी बांधवांना वनहक्कपट्ट्यांचे वितरण करावे. यापूर्वी वितरित केलेल्या पट्ट्यांमधील त्रुटी दुरुस्त करून संबंधितांना ७/१२ नमुने उपलब्ध करून द्यावेत. तसेच आदिवासी बांधवांच्या मालमत्तांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करावी, अशा सूचना बावनकुळे यांनी दिल्या.

वनहक्कपट्ट्यांच्या नियमितीकरणासाठी एमआरसॅकच्या उपलब्ध डेटाचा वापर करून निर्णय घ्यावा. ग्रामस्तरीय समित्यांनी मंजूर केलेल्या वनपट्ट्यांबाबत प्राप्त दावे आणि हरकतींचे नियमानुसार पुनर्विलोकन करावे. अन्नसुरक्षा समित्यांची स्थापना करण्याची कार्यवाहीही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मंत्रालय स्तरावर उपविभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संबंधित आमदारांना अभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती द्यावी, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

हेही वाचा –  कोल्हापुरात स्वतंत्र महसूल न्यायाधिकरण खंडपीठाची मागणी; पश्चिम महाराष्ट्र-कोकणातील नागरिकांना मिळणार जलद न्याय

आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची २८ सप्टेंबरला आरोग्य तपासणी

आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक वुईके यांनी आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची २८ सप्टेंबर रोजी आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक विद्यार्थ्याचे आरोग्य कार्ड तयार करून त्यातील नोंदी अद्ययावत ठेवाव्यात. तपासणीत आढळणाऱ्या आजारांवर आवश्यक उपचार आणि पुढील कार्यवाही सुनिश्चित करावी, असे त्यांनी सांगितले.

संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी २२ सप्टेंबरपर्यंत स्थानिक आमदारांसोबत बैठक घेऊन अभियानातील कार्यवाहीची सविस्तर माहिती द्यावी. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा अंमलबजावणीत समावेश करावा, असेही निर्देश देण्यात आले.

राणी दुर्गावती यांच्या जयंतीनिमित्त ५ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचनाही वुईके यांनी दिल्या. आदिवासी विकास विभागाच्या योजना तसेच शैक्षणिक आणि सामाजिक योजनांची माहिती देणारे चित्ररथ १६ सप्टेंबरपासून विविध भागांत प्रचार-प्रसिद्धी करणार आहेत. या चित्ररथांना संबंधित लोकप्रतिनिधींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.

बैठकीला राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार मंजुळा गावित, डॉ. किरण लहामाटे, आमश्या पाडवी, राजू तोडसाम, दिलीप बोरसे, रामदास मसराम, हिरामण खोसकर, नितीन पवार, डॉ. मिलिंद नरोटे, संजय पुराम, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आदिवासी आयुक्त गोपीचंद कदम तसेच अपर आदिवासी आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button