राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्यासोबत अनोखे रक्षाबंधन; लोकभवनात महिलांनी बांधली राखी
अनाथ मुली, दिव्यांग महिला, स्वच्छता कर्मचारी, आशा सेविका आणि आरोग्य स्वयंसेविकांचा रक्षाबंधन सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग

मुंबई : रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न राहता सामाजिक आपुलकी आणि स्नेहाचा संदेश देणारा ठरला. मुंबईतील लोकभवन येथे आयोजित विशेष रक्षाबंधन सोहळ्यात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना विविध क्षेत्रातील महिलांनी राखी बांधून स्नेहबंध अधिक दृढ केले.
या विशेष कार्यक्रमात अनाथ मुली, दिव्यांग महिला, महिला स्वच्छता कर्मचारी, बीएमसीच्या महिला कर्मचारी, आशा सेविका आणि आरोग्य स्वयंसेविकांनी सहभाग घेतला. विविध सामाजिक स्तरातील महिलांना एकाच व्यासपीठावर आणत रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या कार्यातून प्रेरणा घेणाऱ्या ममता बाल सदनमधील मुलींनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांनी राज्यपालांना राखी बांधून प्रेम, विश्वास आणि संरक्षणाच्या नात्याचा संदेश दिला.
हेही वाचा – मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश
शहराची स्वच्छता, आरोग्यसेवा आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा या सोहळ्यात विशेष गौरव करण्यात आला. आशा सेविका, आरोग्य स्वयंसेविका आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आपल्या दैनंदिन कार्यातून समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.
लोकभवनातील हा रक्षाबंधन सोहळा सामाजिक समता, आपुलकी आणि महिला सन्मानाचा संदेश देणारा ठरला.





