महाराष्ट्राच्या कृषी-व्यवसायाला मिळणार नवी दिशा; ‘मॅग्नेट २.०’मधून मोठ्या गुंतवणुकीची तयारी
कृषी पायाभूत सुविधा, प्रक्रिया, शीतसाखळी आणि निर्यातीला चालना; २०० हून अधिक उद्योग प्रतिनिधींचा गुंतवणूकदार मेळाव्यात सहभाग

मुंबई : राज्यातील कृषी-व्यवसाय क्षेत्रासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासह मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने **‘मॅग्नेट ॲग्रीबिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टर मीट’**चे आयोजन बुधवार, १६ सप्टेंबर रोजी मुंबईत करण्यात आले आहे. या गुंतवणूकदार मेळाव्यामुळे महाराष्ट्राच्या कृषी-व्यवसाय क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, दर्जेदार प्रक्रिया सुविधा निर्माण करणे आणि आधुनिक कृषी पायाभूत सुविधांची उभारणी करणे हा मॅग्नेट २.० प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. कृषी-व्यवसाय क्षेत्रात खासगी गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सक्षम मूल्यसाखळी उभारण्यावर या प्रकल्पातून भर दिला जात आहे.
उत्पादनापासून निर्यातीपर्यंत एकात्मिक मूल्यसाखळी
आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ॲग्रिबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत प्रमुख फळपिके आणि विविध कृषी उत्पादनांसाठी उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, शीतसाखळी, लॉजिस्टिक्स आणि विपणन यांचा समावेश असलेली एकात्मिक मूल्यसाखळी विकसित केली जात आहे.
मॅग्नेटच्या विस्तारित टप्प्यात द्राक्षे, पपई, हळद, अंजीर, शेवगा, टोमॅटो, आले आणि फणस या पिकांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या उत्पादनांना प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा – राजस्थानमध्ये ‘डबल इंजिन’नंतर आता ‘ट्रिपल इंजिन’; स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय
‘हब-अँड-स्पोक’ मॉडेलवर पायाभूत सुविधा
मॅग्नेट २.० अंतर्गत ‘हब-अँड-स्पोक’ मॉडेलवर आधारित मोठ्या प्रमाणावर कृषी-व्यवसाय पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे. या सुविधांमुळे शेतमालाची नासाडी कमी करण्यासोबतच चांगल्या बाजारपेठांमध्ये प्रवेश, मूल्यवर्धन आणि निर्यात संधी वाढण्यास मदत होणार आहे.
शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था, प्रक्रिया उद्योग, निर्यातदार आणि रिटेल क्षेत्र यांना एकाच मूल्यसाखळीत जोडण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जाणार आहे. त्यामुळे शेतमालाला अधिक चांगला बाजारभाव मिळण्यासह कृषी क्षेत्रातील उद्योगांना आवश्यक कच्चा माल आणि बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल.
२०० हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग
शासकीय पातळीवर उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांना बाजारपेठेची मागणी आणि उद्योग क्षेत्राच्या गरजांची जोड देण्यासाठी या गुंतवणूकदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी-व्यवसाय, अन्नप्रक्रिया, बँकिंग, वित्त, शीतसाखळी, लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा विकास आणि स्टार्टअप क्षेत्रातील २०० हून अधिक प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
मेळाव्यात राज्यातील संभाव्य कृषी क्लस्टर्स, गुंतवणुकीच्या संधी आणि आवश्यक पायाभूत सुविधांबाबत उद्योग क्षेत्राकडून सूचना व अभिप्राय घेतले जाणार आहेत. या सूचनांच्या आधारे प्राधान्य कृषी क्लस्टर्स, मूल्यसाखळ्या, पायाभूत सुविधा आणि अपेक्षित गुंतवणुकीचे स्वरूप निश्चित करण्यात येणार आहे.
यानंतर खासगी क्षेत्राचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (EOI) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राला कृषी-व्यवसायाचे प्रमुख केंद्र बनविण्याचे लक्ष्य
मॅग्नेट २.०च्या माध्यमातून महाराष्ट्राला केवळ कृषी उत्पादन करणारे राज्य न ठेवता प्रक्रिया, मूल्यवर्धन, आधुनिक साठवणूक, शीतसाखळी, लॉजिस्टिक्स आणि निर्यातीचे प्रमुख कृषी-व्यवसाय केंद्र बनविण्याच्या दिशेने शासन प्रयत्नशील आहे.
या गुंतवणूकदार मेळाव्यामुळे कृषी क्षेत्रात नवीन गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासोबतच शेतमालाला अधिक मूल्य मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.




