Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला जागतिक ओळख मिळवून देणार; UNESCOच्या अमूर्त सांस्कृतिक वारशासाठी प्रयत्न

‘Bappa.org’ डिजिटल मंचाचे अनावरण; देश-विदेशातील गणेशोत्सवाची माहिती एकत्रित करून जगभरातील भाविकांना महाराष्ट्राच्या उत्सवपरंपरेशी जोडणार

मुंबई : महाराष्ट्राच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा जागतिक व्यासपीठावर पोहोचविण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाचा युनेस्कोच्या (UNESCO) अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश व्हावा, यासाठीही प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रेक्लमेशन येथे ‘Bappa.org’ आणि ‘महाराष्ट्र गणेश उत्सव राज्य महोत्सव’च्या अधिकृत लोगोचे दिमाखात अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला अभिनेते रितेश देशमुख, नेहा पेंडसे, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, श्रीपाद आष्टीकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा

मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून गौरविले आहे. आस्था, श्रद्धा, निष्ठा आणि परंपरेची सांगड घालणारा हा उत्सव केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचा नाही, तर सामाजिक आणि राष्ट्रीय विचारांचे प्रभावी माध्यमही आहे.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून रुजवलेली लोकचळवळ आजही घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून पुढे नेली जात आहे. महाराष्ट्राच्या या समृद्ध परंपरेची व्याप्ती आता जागतिक पातळीवर पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  महाराष्ट्राच्या कृषी-व्यवसायाला मिळणार नवी दिशा; ‘मॅग्नेट २.०’मधून मोठ्या गुंतवणुकीची तयारी

‘Bappa.org’वर जगभरातील गणेशोत्सवाची माहिती

‘Bappa.org’ हा डिजिटल मंच गणेशोत्सवाला जागतिक पातळीवर जोडणारा महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे. या मंचावर देश-विदेशातील घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची माहिती एकत्रित केली जाणार आहे.

यामुळे जगभरातील भाविकांना महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरेशी जोडण्याची संधी मिळेल. विविध ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाची माहिती एका डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध होणार असल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले.

१२ फुटी मोदकाचा चित्ररथ ठरणार आकर्षण

या कार्यक्रमात सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी साकारलेला १२ फुटी भव्य मोदकाचा फिरता चित्ररथ सादर करण्यात आला. गणरायाची प्रतिमा, लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सवाच्या परंपरेशी संबंधित विविध कलात्मक बाबींचा या चित्ररथात समावेश करण्यात आला आहे.

हा चित्ररथ वर्षभर राज्यभर फिरविण्यात येणार आहे. त्याद्वारे महाराष्ट्र गणेश उत्सव राज्य महोत्सवाची व्याप्ती वाढविण्यासोबतच लोककला, सांस्कृतिक परंपरा आणि गणेशोत्सवाच्या इतिहासाचे जतन, संवर्धन आणि प्रसार केला जाणार आहे.

जागतिक पातळीवर महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख

धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक एकोपा, लोकसहभाग, कला आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या महाराष्ट्राच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला जागतिक ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने ‘Bappa.org’ आणि UNESCOच्या अमूर्त सांस्कृतिक वारशासाठी सुरू असलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरणार आहेत. या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख देश-विदेशात अधिक व्यापक करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button