Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

एसटीच्या १२५ बसस्थानकांवर उभारणार ‘हिरकणी कक्ष’

टोयोटा किर्लोस्करच्या CSR निधीतून उपक्रम; तीन वर्षांत १२५ कक्ष उभारण्याचे नियोजन, एसटीकडून संचालन व देखभालीची जबाबदारी

मुंबई : महाराष्ट्रातील लाखो महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एसटी महामंडळाने टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडसोबत १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते.

महिलांना, विशेषतः स्तनदा मातांना, प्रवासादरम्यान बाळाची काळजी घेण्यासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि खासगी जागा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. एसटी बसस्थानकांवर मातृत्वासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

टोयोटा किर्लोस्करच्या CSR निधीतून सुविधा

या प्रकल्पासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत सहकार्य करणार आहे. करारानुसार राज्यातील एसटी बसस्थानकांवर अंदाजे ३ मीटर × ३ मीटर आकाराचे प्री-फॅब्रिकेटेड ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार आहेत.

या कक्षांमध्ये स्तनपान तसेच बाळाची निगा राखण्यासाठी मातांना सुरक्षित आणि खासगी जागा उपलब्ध होईल. आवश्यक फर्निचर, फिक्स्चर, अंतर्गत वायरिंग, विद्युतीकरण आणि इलेक्ट्रॉनिक साहित्याचाही प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

तीन वर्षांत १२५ कक्ष

करारानुसार तीन आर्थिक वर्षांत एकूण १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार २०२६-२७ मध्ये ५०, २०२७-२८ मध्ये ५० आणि २०२८-२९ मध्ये २५ कक्ष उभारण्यात येणार आहेत.

CSR धोरण, उपलब्ध जागा आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन या संख्येत आवश्यकतेनुसार बदल करण्याची तरतूदही करारात करण्यात आली आहे.

हेही वाचा –  महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला जागतिक ओळख मिळवून देणार; UNESCOच्या अमूर्त सांस्कृतिक वारशासाठी प्रयत्न

एसटीकडून जागा, वीज-पाण्याची सुविधा

या प्रकल्पासाठी एसटी महामंडळाकडून सुमारे ५ मीटर × ५ मीटर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आवश्यक वीज, पाणी, स्थापनेसाठी सहकार्य आणि शासकीय परवानग्या मिळवून देण्याची जबाबदारी एसटीची असेल.

कक्षांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आणि सुविधा महामंडळाकडे हस्तांतरित झाल्यानंतर त्यांचे संचालन, सुरक्षा, दुरुस्ती, देखभाल आणि देखरेखीची संपूर्ण जबाबदारी एसटी महामंडळाची राहणार आहे.

विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी एसटी महामंडळाकडून कोणतेही आर्थिक योगदान दिले जाणार नाही. संपूर्ण प्रकल्प टोयोटा किर्लोस्करच्या CSR उपक्रमातून राबविण्यात येणार आहे.

हिरकणी कक्ष’ ठरणार मातृत्वाच्या सन्मानाचे पाऊल

एसटी ही केवळ प्रवासाची सेवा नसून महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाशी जोडलेली लोकवाहिनी आहे. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या बसस्थानकांवर स्तनदा मातांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध झाल्याने महिला प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सुसह्य होण्यास मदत होणार आहे.

‘हिरकणी कक्ष’ हा केवळ सुविधा प्रकल्प नसून मातृत्वाचा सन्मान, महिलांच्या गरजांची जाणीव आणि प्रवासी-केंद्रित एसटी व्यवस्थेच्या दिशेने टाकलेले संवेदनशील पाऊल आहे, असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button