MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील; ‘तुमच्यासाठी सारा महाराष्ट्र बंद करू’
‘MPSC अध्यक्षांचा राजीनामा द्यावाच लागेल’; फडणवीसांवरही जरांगेंचा हल्लाबोल, विद्यार्थ्यांना आंदोलनात ठाम राहण्याचे आवाहन

पुणे : MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत सरकारवर जोरदार टीका केली.
‘तुमच्यासाठी सारा महाराष्ट्र बंद करू,’ असा इशारा जरांगे पाटील यांनी यावेळी दिला. महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, ते तरुणांच्या हिताचे असले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आंदोलन करताना कोणताही कलंक लागू नये, याची काळजी घ्यावी. तुमचे आई-वडील तुमची घरी वाट पाहत आहेत, असे आवाहनही त्यांनी केले.
नोकरी मिळाल्यानंतर कुटुंबातील अनेक अडचणींवर मात करण्याची ताकद मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका, असे म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारला लक्ष्य केले. विद्यार्थ्यांचे आंदोलन राजकीय कसे काय, असा सवाल करत विद्यार्थ्यांना बळ देणे चुकीचे आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
‘MPSC अध्यक्षांचा राजीनामा द्यावाच लागेल’
MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या भूमिकेवरही जरांगे पाटील यांनी टीका केली. ‘राजीनामा द्यावाच लागेल,’ असे ते म्हणाले. तसेच भीमनवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी सरकारने त्यांना एका दिवसात पदावरून हटवावे, अशी मागणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जरांगे पाटील यांनी निशाणा साधला. ‘फडणवीस, तुम्ही त्यांचे प्रवक्ते म्हणून काम करता का?’ असा सवाल त्यांनी केला. गरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असून त्यांच्या आई-वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा होऊ देऊ नका, असेही ते म्हणाले.
‘मला सकाळपासून फोन येत आहेत’
आंदोलनात सहभागी होऊ नये, यासाठी आपल्याला सकाळपासून फोन येत असल्याचा दावाही जरांगे पाटील यांनी केला. ‘तिकडे जाऊ नको,’ असे सांगणारे फोन येत असल्याचे ते म्हणाले. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आपण आंदोलनस्थळी आलो असून हा प्रश्न केवळ एका समाजाचा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत, गरिबांच्या मुलांनी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहू नये का, असा सवालही जरांगे पाटील यांनी केला.





