TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

२०२७ ‘मेट्रो वर्ष’ म्हणून साजरे करा; किमान ७० किमी मेट्रो मार्गिका पूर्ण करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

डिसेंबर २०२६पर्यंतच्या ३६ किमी मार्गिकांची व्याप्ती ५० किमीपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य; प्रकल्पांमध्ये किमान ५० टक्के यांत्रिकीकरणावर भर

मुंबई : राज्यातील मेट्रो प्रकल्पांना वेग देण्यासाठी २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ म्हणून निश्चित करून पुढील वर्षात किमान ७० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका पूर्ण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. डिसेंबर २०२६पर्यंत पूर्ण होणाऱ्या ३६ किलोमीटर मेट्रो मार्गिकांची व्याप्ती ५० किलोमीटरपर्यंत वाढवण्यासाठी प्रलंबित कामांना गती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वॉर रूमच्या बैठकीत फडणवीस यांनी विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पायाभूत सुविधांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रकल्पांवरील किमान ५० टक्के काम यांत्रिकीकरणावर आधारित असावे. कौशल्याधारित कामगारांची उपलब्धता निश्चित करून मजुरांच्या तुटवड्यावर यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून उपाय शोधावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

मेट्रो २-बच्या कामासाठी विशेष रस्ता ब्लॉक

मेट्रो मार्गिका २-बमधील डी. एन. नगर ते चेंबूर मार्गावरील जुहू सर्कलजवळील गर्डरचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार रविवारी १२ तासांचा विशेष रस्ता ब्लॉक नियोजित करावा, असे निर्देश फडणवीस यांनी दिले. कामाची सद्यस्थिती पाहून पुढील रस्ता ब्लॉकचा निर्णय घ्यावा आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवडी ते वरळी उन्नत मार्गिकेची जोडणी ३१ मे २०२७पूर्वी पूर्ण करून हा मार्ग नागरिकांच्या सेवेत आणावा. नवीन रस्ता दुसऱ्या रस्त्याला जोडताना वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी आधीच नियोजन करावे. वाकोला जंक्शन तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या ठिकाणी तंत्रज्ञानाच्या मदतीने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

हेही वाचा –  MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील; ‘तुमच्यासाठी सारा महाराष्ट्र बंद करू’

भूमिगत सुविधांचे ‘मॅपिंग’ करण्याचे निर्देश

एमएमआरडीए, मुंबई महापालिका आणि अन्य यंत्रणांनी भूमिगत नागरी सुविधांचे अद्ययावत ‘मॅपिंग’ करावे. पायाभूत सुविधांची कामे करताना ही माहिती सहज उपलब्ध झाल्यास प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी कमी करता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रकल्पस्थळी नागरिक आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक फलक, बॅरिकेड्स आणि इतर सुरक्षा उपाययोजना बंधनकारकपणे कराव्यात. प्रकल्पस्थळावरील सुरक्षा व्यवस्थेसाठी स्वतंत्र कंपनी निर्माण करून या सेवांसाठी कमी खर्चाचे नवीन व्यवसाय प्रारूप विकसित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगरातील प्रत्येक घराला नळजोडणी

छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करताना शहरातील प्रत्येक घराला नळजोडणी मिळेल, याची दक्षता घ्यावी. नळजोडणीसाठी भविष्यात पुन्हा खोदकाम करण्याची गरज भासणार नाही, अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

कंत्राटदारांकडून केवळ काम पूर्ण करून न घेता निर्धारित उद्दिष्ट साध्य होईल, अशा पद्धतीने प्रकल्प पूर्ण करून घ्यावेत. निर्धारित कालावधी उलटूनही काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचा इशाराही फडणवीस यांनी दिला.

मेट्रो मार्गिका क्रमांक ६ मधील स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी दरम्यान जमिनीच्या ताब्याशी संबंधित तसेच न्यायालयीन प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव के. गोविंदराज, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अपर मुख्य सचिव पराग जैन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शिवडी-वरळी उन्नत रस्ता जोडणी, मेट्रो मार्गिका ९ (दहिसर पूर्व-मीरा-भाईंदर), मेट्रो मार्गिका ५ (ठाणे-धामणकर नाका-कशेळी डेपो), मेट्रो मार्गिका २-ब (डी. एन. नगर-डायमंड गार्डन-मंडाले), मेट्रो मार्गिका ६ (स्वामी समर्थ नगर-विक्रोळी) आणि छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button