दूध भेसळीविरोधात FDAची राज्यभर धडक कारवाई; २,३४८ किलो दुग्धजन्य पदार्थ आणि २०२ लिटर दूध जप्त
महापेत १२ लाखांचा साठा जप्त; बीडमध्ये कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या १,८०० किलो व्हे पावडरवर कारवाई

मुंबई : दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवली. १९ आणि २० ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या कारवाईत २,३४८ किलो दुग्धजन्य पदार्थ व पावडर तसेच २०२ लिटर दूध जप्त करण्यात आले. या कारवाईत दूध व दुग्धजन्य पदार्थांसह अन्य अन्नपदार्थांचा सुमारे २६ लाख ४१ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
राज्यभरातील ८९ हॉटेल, रेस्टॉरंट, डेअरी आणि अन्य अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७१ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या असून, १३ अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
नवी मुंबईतील एमआयडीसी, महापे परिसरातील भास्कर डेअरीची १९ ऑगस्ट रोजी तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील कलम २६ आणि २७च्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा संशय असलेला दुग्धजन्य पदार्थांचा साठा आढळून आला.
एफडीएने ४७३ किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि ७५ किलो मीडियम फॅट पनीर जप्त केले. या एकूण ५४८ किलो साठ्याची किंमत सुमारे ११ लाख ८३ हजार ३२० रुपये आहे.
महापे येथील पी. के. डेअरीची तपासणी करताना ३९३ लिटर सैल म्हशीचे दूध आणि ३६८ लिटर सैल गायीचे दूध, असा एकूण ७६१ लिटर साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत ४० हजार ५५८ रुपये आहे. दूध निर्धारित मानकांनुसार आहे की नाही, याची पुढील तपासणी करण्यात येत आहे.
हेही वाचा – ‘फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळावे, ही महाराष्ट्राची भावना’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
नवी मुंबईतील विजय डेअरीतूनही १४१ लिटर दूध जप्त करण्यात आले. यात १३८ लिटर म्हशीचे आणि तीन लिटर गायीचे दूध होते. सुमारे १० हजार ९४४ रुपयांचा हा साठा अवमानक असल्याचा संशय आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी परिसरात एफडीए आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संशयित १,८०० किलो व्हे पावडरचा साठा जप्त केला.
आष्टी-जामगाव रस्त्यावर पिकअप वाहनातून व्हे पावडरची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने कारवाई केली. वाहनाची तपासणी केली असता २५ किलो वजनाच्या ४७ गोण्या आढळल्या. चौकशीत आणखी २५ गोण्या यापूर्वी आष्टी परिसरात उतरवण्यात आल्याचे समोर आले. दोन्ही ठिकाणचा साठा मिळून एकूण ७२ गोण्या अर्थात १,८०० किलो व्हे पावडर जप्त करण्यात आली.
या मालाच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना, खरेदी-विक्रीची बिले, वाहतूक चलन किंवा इतर अधिकृत कागदपत्रे आढळली नाहीत. प्राथमिक तपासात ही पावडर दूध संकलन केंद्रे आणि डेअऱ्यांना पुरवून कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दूध भेसळीच्या साखळीतील उत्पादक, पुरवठादार आणि खरेदीदारांचा शोध सुरू आहे.
दूध भेसळीबरोबरच प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूविरोधातही राज्यभर कारवाई करण्यात आली. मुंबई, कोकण, पुणे आणि नागपूर विभागांत मिळून १२ एफआयआर दाखल करून १८ जणांना अटक करण्यात आली. प्रतिबंधित पदार्थांचा मोठ्या किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून काही आस्थापनांवर सीलची कारवाई करण्यात आली.
अकोल्यातील समीर एंटरप्रायझेस येथे लेबलिंग नियमांचे उल्लंघन केल्याच्या संशयावरून ३,४१६.८ किलो रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत सुमारे ६ लाख १९ हजार ८०० रुपये आहे. ‘सुपर सूर्य’ आणि ‘दिव्या’ या ब्रँडच्या तेलाचा हा साठा असल्याची माहिती आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे. दूध भेसळ, प्रतिबंधित पदार्थांची विक्री आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





