TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

‘वंदे मातरम’वरून राजकीय रणकंदन; अमित शाह यांचा काँग्रेसवर तुष्टीकरणाचा आरोप

अमित शाह यांचा काँग्रेसवर जोरदार निशाणा; दोन कडव्यांवरून राष्ट्रीय राजकारण तापले

नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत ‘वंदे मातरम’ संदर्भात मंजूर करण्यात आलेल्या ठरावावरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत पक्षावर तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, काँग्रेसने ‘वंदे मातरम’बाबत आपली भूमिका स्पष्ट असून १९३७ मधील निर्णयावर पक्ष ठाम असल्याचे म्हटले आहे.

अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका करताना, १९३७ मध्ये मुस्लिमांना खूश करण्यासाठी ‘वंदे मातरम’चे विभाजन करण्यात आले आणि त्यातून देशाच्या फाळणीचा पाया रचला गेला, असा आरोप केला. काँग्रेसने देशविरोधी निर्णय घेतल्याचा आरोप करत नागरिकांनी या भूमिकेविरोधात एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अमित शाह यांनी पुढे म्हटले की, काँग्रेस आजही आपल्या १९३७ च्या ठरावावर ठाम असून संसदेच्या कायद्यालाही विरोध करत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मात्र, काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘वंदे मातरम’बाबत पक्षाच्या भूमिकेत कोणताही संभ्रम नसल्याचे स्पष्ट करत गांधी, नेहरू आणि पटेल यांच्या काळात १९३७ मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयावर काँग्रेस कायम असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

हेही वाचा –  रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकण्यावर भर; १५ ऑगस्टनंतर अंमलबजावणीला सुरुवात

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली. ‘वंदे मातरम’ हे भारताच्या अभिमानाचे प्रतीक असून त्याचे पूर्ण रूप न गाणे हा केवळ गीताचा नव्हे, तर भारतमातेचाही अपमान असल्याचे त्यांनी म्हटले.

भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनीही सोशल मीडियावरील पोस्टद्वारे काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस कार्यकारिणी समितीने केवळ दोन कडवे गाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करत काँग्रेसने स्वतःला देश आणि संविधानापेक्षा मोठे समजू नये, अशी टीका त्यांनी केली.

या वादात काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप ‘वंदे मातरम’च्या मुद्द्याचे राजकारण करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

दरम्यान, या वादात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही काँग्रेस नेतृत्वावर जोरदार टीका केली. त्यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांवर गंभीर राजकीय आरोप करत ‘वंदे मातरम’चा अपमान म्हणजे भारताचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

पावसाळी अधिवेशनादरम्यान ‘वंदे मातरम’ संदर्भातील विधेयकावर संसदेत चर्चा झाली होती. या मुद्द्यावरून आता राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील प्रमुख नेत्यांनी पहिली दोन कडवी गाण्याबाबत सहमती दर्शविल्याचा युक्तिवाद केला आहे.

या वादात विश्व हिंदू परिषदेनेही भूमिका मांडली आहे. संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी काँग्रेसवर टीका करत ‘वंदे मातरम’च्या उर्वरित भागातील भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि परंपरांशी संबंधित शब्दांना विरोध केला जात असल्याचा आरोप केला आहे.

एकूणच, ‘वंदे मातरम’चे किती कडवे गायचे, १९३७ मधील काँग्रेसची भूमिका आणि संसदेत झालेल्या निर्णयावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आगामी काळात हा मुद्दा राष्ट्रीय राजकारणात आणखी तापण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button