राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमापूर्वी पुण्यात विद्यार्थी संघटनांमध्ये राडा; काँग्रेस-अभाविप आमनेसामने

पुणे | लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आज ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम पुण्यातील एसएसपीएमपीएस प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमापूर्वीच पुण्यात दोन विद्यार्थी संघटनांमध्ये राडा झाला. या कार्यक्रमापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहासमोर घोषणाबाजी केली. तर, COEP कॉलेजमधील काही विद्यार्थीनींना मारहाण करण्यात आल्याचा दावा महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे.
या आरोपांसंदर्भात महाराष्ट्र काँग्रेसने रात्री पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर विविध आरोप केले. “काल COEP कॉलेजमधील काही विद्यार्थीनींनी माध्यमांमध्ये बाईट दिला होता की, कॉलेजमधून आम्हाला तीन वर्षांपासून स्कॉलरशीप मिळालेली नाही. हा मुद्दा आम्ही राहुल गांधी यांच्यासमोर मांडणार आहोत. यानंतर ABVPच्या काही गुंडांनी या मुलींना धमकावलं, त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाला जावू नये यासाठी त्यांना डांबून ठेवण्यात आलं, तसंच रात्री ८ वाजेपर्यंत त्यांनी कॉलेजची बदनामी थांबवत आम्ही सांगू त्या पद्धतीनं माध्यमांना बाईट द्यायचा, अन्यथा तुम्हाला हॉस्टेलमधून आणि कॉलेजमधून काढून टाकू अशी धमकी त्या विद्यार्थीनींना देण्यात आली. याचा NSUI कार्यकर्त्यांनी विरोध केला असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली”, असा दावा महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने ही गुंडगिरी सुरू असेल तर फडणवीसांनाही यांचे एक दिवस उत्तर द्यावे लागेल. महाराष्ट्रातले विद्यार्थी हे विसरणार नाहीत. फडणवीसांनी ABVP च्या गुंडांना नियंत्रित करावे अन्यथा जनताच यांना धडा शिकवेल. काँग्रेसने या देशातून इंग्रजांना पळवून लावलंय, तुमचे गुंड पळवून लावायला वेळ लागणार नाही”, असा इशाराही या पोस्टमधून देण्यात आला आहे.
हेही वाचा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्ञानशिल्पाचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण
काल COEP कॉलेजमधील काही विद्यार्थीनींनी माध्यमांमध्ये बाईट दिला होता की, कॉलेजमधून आम्हाला तीन वर्षांपासून स्कॉलरशीप मिळालेली नाही. हा मुद्दा आम्ही राहुल गांधी यांच्यासमोर मांडणार आहोत. यानंतर ABVPच्या काही गुंडांनी या मुलींना धमकावलं, त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाला जावू नये…
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 21, 2026
“विद्यार्थी व विद्यार्थीनींचा कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी तो आता तुम्ही दाबू शकणार नाही, ‘छात्रोंकीगुंज’ होणारच, विद्यार्थीनींचा आवाज घूमणारच!”, असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.
काँग्रेस नेते, लाेकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमास पुणे पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह ५०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तास तैनात राहणार आहेत.
एसएसपीएमएस प्रशालेच्या मैदानावर पार पाडणाऱ्या या कार्यक्रमास होणारी गर्दी विचारात घेऊन आरटीओ चौक परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहे. या भागात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक शाखेतील ७०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तास तैनात राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी ४२ हजार विद्याार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती देण्यात आली. प्रवेशद्वार, वाहनतळाच्या परिसरात बंदोबस्तास तैनात करण्यात येणार आहे. आरटीओ चौकापासून राजाबहादूर मिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर गर्दी वाढल्यास वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.




