TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकण्यावर भर; १५ ऑगस्टनंतर अंमलबजावणीला सुरुवात

चालकांना मराठीचे ज्ञान आवश्यक; नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी RTOकडून तयारी सुरू

मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलता आली पाहिजे, अशी भूमिका परिवहन मंत्रालयाने घेतली आहे. मराठी भाषेच्या सक्तीला सुरुवातीला काही रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी विरोध केला होता. त्यामुळे मराठी भाषा शिकण्यासाठी सरकारकडून चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यासाठी विशेष मराठी भाषा वर्गही घेण्यात आले होते.

१५ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे परिवहन मंत्रालयाकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. मुदत संपल्यानंतर आता या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणे अपेक्षित असताना, कारवाईच्या मुद्द्यावर RTO यंत्रणेतच संभ्रम असल्याचे समोर आले आहे.

मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यासाठी RTOच्या भरारी पथकांना अद्याप कार्यालयाकडून स्पष्ट सूचना मिळालेल्या नसल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री RTO कार्यालयाकडून दहा अधिकाऱ्यांची यादी पाठवण्यात आली होती. मात्र, यातील बहुतांश अधिकारी सध्या फोनवर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – जागृती मंचतर्फे “Hack the Problem, Build the Future – AI Poster Presentation Challenge” स्पर्धेचे आयोजन

दरम्यान, कारवाई सुरू करण्यापूर्वी RTO अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सकाळपासून अद्याप कोणत्याही ठिकाणी भरारी पथकाकडून कारवाई झालेली नसल्याने मराठी भाषा नियमाच्या अंमलबजावणीबाबत RTO यंत्रणेत नेमका काय निर्णय झाला आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

काही ठिकाणी हिंदी भाषिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून अजूनही मराठी भाषेच्या सक्तीला विरोध होत असल्याचे चित्र आहे. मात्र, १५ ऑगस्टनंतर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता आलीच पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर RTOकडून कारवाई होण्याची शक्यता असून, त्यांचा परवानाही निलंबित केला जाऊ शकतो.

आता प्रत्यक्ष कारवाई कधी सुरू होणार आणि मराठी भाषेच्या नियमाची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने केली जाणार, याकडे रिक्षा-टॅक्सी चालकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button