‘पतंजली सांभाळा, उत्पादनांच्या दर्जावर लक्ष द्या’; अभिजीत दिपकेंचे रामदेवबाबांना रोखठोक प्रत्युत्तर!

Abhijeet Dipke | NEET पेपर लीक प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतरवर पार पडलेल्या आंदोलनावरून सुरू झालेले राजकीय युद्ध आता अधिकच पेटले आहे. “जेन झीने एकत्र येऊन देशाची बदनामी केली,” या रामदेवबाबांच्या वक्तव्यावर कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला आहे. “रामदेवबाबांनी देश कसा चालवायचा हे सांगण्यापेक्षा पतंजलीच्या उत्पादनांचा दर्जा सुधारावा, अन्यथा पतंजली बंद पडेल,” असा घणाघाती टोला दिपकेंनी लगावला आहे.
रामदेवबाबांच्या टीकेचा समाचार घेताना अभिजीत दिपके म्हणाले, “आम्ही देशाची कोणती बदनामी केली? स्वतःच्या हक्कांसाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरणे ही बदनामी असते का? आंदोलनादरम्यान आम्ही महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे फलक घेऊन शांततेने चालत होतो. ही जर बदनामी असेल, तर बाबांनी आधी आपल्या व्यवसायाकडे लक्ष द्यावे. पतंजलीच्या उत्पादनांमध्ये भेसळ असल्याचे खुद्द सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी तिथे लक्ष द्यावे; देश आणि लोकशाही सांभाळायला ‘जेन झी’ पूर्णपणे सक्षम आहे.”
हेही वाचा
ग्लासगोत भारताचा डंका! दिलीप गावितला सुवर्ण, मोहम्मद बासिलला रौप्य
दिपकेंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही थेट निशाणा साधला. सीजीपीला (CJP) परदेशातून फंडिंग मिळत असल्याच्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले, “देशात अमित शाह गृहमंत्री असताना आंदोलनाला परकीय निधी कसा काय मिळू शकतो? जर असा निधी येत असेल, तर हे गृहमंत्र्यांचे आणि त्यांच्या गुप्तचर यंत्रणांचे मोठे अपयश आहे. स्वतःला चाणक्य म्हणवणाऱ्या गृहमंत्र्यांनी या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे.”





