TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

मुंबई-पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकांना उत्स्फूर्त प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंची उपस्थिती

गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित; गणेश भक्तांना सुरक्षित आणि शिस्तबद्ध सहभागाचे आवाहन

मुंबई : दहा दिवसांच्या भक्तिमय उत्सवानंतर गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबई आणि पुण्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहेत. लाखो गणेशभक्त मिरवणुकांमध्ये सहभागी होत असून, प्रशासन आणि पोलिसांकडून सुरक्षिततेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गणेशमूर्तींच्या विसर्जन सोहळ्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेशभक्तांचा उत्साह आणि प्रशासनाच्या नियोजनाचे कौतुक केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दहा दिवस भक्तिभावाने गणरायाची पूजा केल्यानंतर आज विसर्जनाचा दिवस आहे. या काळात प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आनंद आणि विरह अशा दोन्ही भावना असतात. पुढील वर्षी बाप्पाने लवकर यावे, अशी प्रार्थना प्रत्येक भक्त करत असतो.

हेही वाचा –  साताऱ्यात डॉल्बीचा दणदणाट महागात; १५ गुन्हे दाखल, २.२५ कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबईतील विसर्जन मिरवणुका अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असून, पुण्यातही मोठ्या प्रमाणावर मिरवणुका शांततेत पार पडत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. गणेशोत्सव हा आनंदाचा पर्व असून, नागरिकांनी सुरक्षितपणे आणि शिस्तीने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेल्या नियोजनाचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. यावेळी पत्रकारांनी विरोधकांबाबत प्रश्न विचारला असता, “विरोधकांना सुबुद्धी यावी आणि कुबुद्धीचे विसर्जन व्हावे,” अशी अपेक्षा बाप्पाकडे व्यक्त केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुंबई आणि पुण्यातील विसर्जन मिरवणुकांमध्ये लाखो भाविक सहभागी होत असूनही उत्सव शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असल्याचे सांगितले. गणेश मंडळांकडूनही आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबई महापालिका, मुंबई पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी केलेल्या व्यवस्थेबद्दल शिंदे यांनी त्यांचे आभार मानले. तसेच, “बळीराजाच्या मागे सरकार खंबीरपणे उभे राहिले आहे आणि यापुढेही राहणार आहे,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button