ग्लासगोत भारताचा डंका! दिलीप गावितला सुवर्ण, मोहम्मद बासिलला रौप्य
१०० मीटर शर्यतीत भारतीय खेळाडूंचा दबदबा; स्कॉटलंडच्या भूमीत उंचावला तिरंगा

CWG 2026 | ग्लासगो येथे सुरू असलेल्या २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पॅरा अॅथलीट्सनी दणदणीत कामगिरी करत इतिहास रचला आहे. पुरुषांच्या १०० मीटर टी४७ प्रकारात भारताच्या दिलीप म्हादू गावित याने सुवर्णपदक, तर मोहम्मद बासिल याने रौप्यपदक जिंकून भारताला दुहेरी यश मिळवून दिले. अंतिम शर्यतीत दिलीप गावितने शेवटच्या ३० मीटरमध्ये जबरदस्त वेग वाढवत १०.७१ सेकंदांत शर्यत पूर्ण केली आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर केरळच्या मोहम्मद बासिलने १०.८३ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदकावर कब्जा केला.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात एकाच पॅरा अॅथलेटिक्स प्रकारात भारताने दोन पदके जिंकण्याची ही दुसरीच वेळ ठरली आहे. यापूर्वी चालू स्पर्धेतच महिलांच्या शॉटपुट एफ५७ प्रकारात शर्मिला धनकर हिने सुवर्ण आणि शिल्पा हिने कांस्यपदक पटकावून इतिहास घडवला होता. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या २३ वर्षीय दिलीप गावित याने यापूर्वी २०२२ च्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर टी४७ प्रकारातही सुवर्णपदक पटकावले होते.
हेही वाचा
‘जेन झी’ने एकत्र येऊन भारताला बदनाम केलं; जंतर-मंतर आंदोलनावरून रामदेवबाबांचा घणाघात!
पाच वर्षांचा असताना आंब्याच्या झाडावरून पडल्यामुळे दिलीपला आपला उजवा हात गमवावा लागला होता. मात्र, जिद्दीच्या जोरावर वयाच्या १७व्या वर्षी प्रशिक्षक वाजीनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने अॅथलेटिक्समध्ये पाऊल ठेवले. स्थानिक स्पर्धेत त्याची गुणवत्ता ओळखून प्रशिक्षक काळे यांनी त्याला शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले.
दुसऱ्या बाजूला, जन्मजात उजवा हात नसलेल्या केरळच्या मोहम्मद बासिलने वयाच्या १६व्या वर्षी धावण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे, राष्ट्रकुल स्पर्धेच्या निवड चाचणीत (CWG Trials) बासिलने १०.६४ सेकंद वेळ नोंदवत दिलीपला मागे टाकले होते. मात्र, ग्लासगो येथील मुख्य अंतिम फेरीत दिलीपने पुनरागमन करत सुवर्णपदकावर मोहर उमटवली.
टी४७ प्रकार म्हणजे काय?
पॅरा अॅथलेटिक्समधील टी४७ (T47) या प्रकारात कोपराखालचा किंवा मनगटाचा हात गमावलेले अथवा हातामध्ये शारीरिक अपंगत्व असलेले खेळाडू सहभागी होतात. या खेळाडूंच्या पायांची कार्यक्षमता मात्र पूर्णपणे सामान्य असते.





