TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साताऱ्यात डॉल्बीचा दणदणाट महागात; १५ गुन्हे दाखल, २.२५ कोटींचा मुद्देमाल जप्त

गणेश विसर्जन मिरवणुकीतील नियमभंगावर पोलिसांची कारवाई; ज्येष्ठ नागरिकांचा ध्वनिप्रदूषणाविरोधात मूक मोर्चा

सातारा : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी डॉल्बी चालकांवर धडक कारवाई केली. वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी साउंड सिस्टीमविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यापैकी शाहूपुरी पोलीस ठाण्यात १२, तर सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईदरम्यान डॉल्बी साउंड सिस्टीमसह ट्रॅक्टर, ट्रक आणि टेम्पो असा सुमारे २ कोटी २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

ज्येष्ठ डॉक्टरांचा मूक मोर्चा

दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे-डॉल्बी आणि लेझर लाइटच्या वापराविरोधात साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिक आणि डॉक्टरांनी मूक मोर्चा काढला. हातात निषेधाचे फलक घेऊन मौन पाळत त्यांनी ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डीजेवर कारवाई केल्याबद्दल या ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे अभिनंदनही केले. सण-उत्सवांमध्ये ध्वनिप्रदूषणाचे नियम सर्वांसाठी समानपणे लागू करावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

हेही वाचा –  UAEच्या नवनियुक्त राजदूतांची राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्याशी सदिच्छा भेट

कारवाईवर मंडळाच्या कार्यकर्त्यांची नाराजी

पोलिसांच्या कारवाईनंतर काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. डीजेसमोर महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, मात्र डीजे बंद केल्यानंतर अनेकजण मिरवणुकीतून निघून गेल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला.

ध्वनीमर्यादेचे उल्लंघन होत असल्यास कारवाई करण्यास आमचा विरोध नाही; मात्र गणेश विसर्जन मिरवणुकीत नियमांचे पालन करत उत्सव साजरा करण्यासाठी स्पष्ट आणि व्यवहार्य व्यवस्था असावी, अशी भूमिका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, सातारा पोलिसांच्या कारवाईमुळे विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, उत्सवाचा आनंद आणि ध्वनीप्रदूषणावरील निर्बंध यांचा समतोल कसा साधला जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group