ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना धरण १०० टक्के भरले; पाणी कपात तात्काळ रद्द करा!

राष्ट्रवादीच्या माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांची मागणी

महापालिका सर्वसाधारण सभेत सभागृहाचे लक्ष वेधले

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पवना धरण १०० टक्के भरलेले असताना पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, शहरातील लागू असलेली पाणी कपात तात्काळ रद्द करून पूर्ववत नियमित, पुरेसा आणि वेळेवर पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी ठाम मागणी माजी महापौर वैशाली घोडेकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली.

पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे ४० लाख नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, शहराला जीवनदायी ठरणारे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने नदीपात्रातूनही नियमित पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे शहरावरील पाणीटंचाईचे संकट मोठ्या प्रमाणात दूर झाले आहे. असे असतानाही महापालिकेकडून अद्याप पाणी कपात कायम ठेवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांसह गृहनिर्माण संस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, अनेक सोसायट्यांना आजही टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

माजी महापौर वैशाली घोडेकर यांनी प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, पवना धरण शंभर टक्के भरलेले असताना शहरावर पाणी कपातीचे संकट कायम ठेवण्यामागे नेमके कारण काय आहे, याबाबत प्रशासनाने नागरिकांना स्पष्ट उत्तर देणे आवश्यक आहे. महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर केला. आता धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळणे ही त्यांची रास्त अपेक्षा आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, पाणी ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज आहे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना तसेच घरगुती वापरासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे. शहराचा वेगाने वाढणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता नियमित व नियोजनबद्ध पाणीपुरवठा करणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे.

हेही वाचा

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; जडेजाचे २६२ दिवसांनंतर पुनरागमन!

पाणी कपातीमुळे नागरिकांना टँकरसाठी अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असून, सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडत असल्याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच, धरण पूर्ण क्षमतेने भरले असतानाही पाणी कपात कायम ठेवली जाणार असेल, तर भविष्यात पाणीसाठा किती टक्के झाल्यानंतर पाणी कपात रद्द करण्यात येणार, याबाबत स्पष्ट आणि पारदर्शक धोरण नागरिकांसमोर मांडण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

माजी महापौर घोडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये शहरातील लागू असलेली पाणी कपात तात्काळ रद्द करणे, पूर्ववत नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुरू करणे, भविष्यात पाणी कपात लागू करण्यासाठी व रद्द करण्यासाठी स्पष्ट धोरण निश्चित करून ते जाहीर करणे तसेच शहरातील प्रत्येक भागात समान आणि न्याय्य पाणी वितरण सुनिश्चित करणे, या मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सध्याच्या उपलब्ध पाणीसाठ्याचे, दररोजच्या पाणी वापराचे आणि आगामी वर्षभराच्या पाणी नियोजनाचे श्वेतपत्रक सभागृहासमोर सादर करावे, अशीही त्यांनी ठाम मागणी केली.

महापालिका आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद…

दरम्यान, माजी महापौर वैशाली घोडेकर यांनी उपस्थित केलेल्या मागणीची दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पाणीपुरवठ्याच्या सध्याच्या परिस्थितीचा तातडीने आढावा घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात येणार असून, शहरातील लागू असलेल्या पाणी कपातीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले. पवना धरणातील उपलब्ध पाणीसाठा, शहराची दैनंदिन पाण्याची गरज आणि भविष्यातील नियोजनाचा सर्वंकष विचार करून नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“पाणी हा केवळ प्रशासकीय विषय नसून तो प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी, आरोग्याशी आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे. पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागणे ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे नागरिकांच्या हिताचा विचार करून प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा.

– डॉ. वैशाली घोडेकर, माजी महापौर, पिंपरी-चिंचवड.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button