पावसाची दडी संपणार? पुढील दोन दिवस ‘या’ भागांत जोरदार सरींची शक्यता

पावसाची दडी संपणार? पुढील दोन दिवस ‘या’ भागांत जोरदार सरींची शक्यता

मुंबई : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून अनेक भागांत पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. पावसाअभावी शेतकरी चिंतेत असून काही ठिकाणी पिकांवर परिणाम होऊ लागला आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत राज्यातील काही भागांत हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

24 ऑगस्ट रोजी कोकण-गोवा परिसरातील बहुतांश भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतही पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील काही भागांत हलका ते मध्यम किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भातील अमरावती जिल्ह्यात 25, 26 आणि 27 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे डख यांनी म्हटले आहे. वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यांतही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

बुलढाणा, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यांतही दिलासादायक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातही चांगला पाऊस पडू शकतो.

हेही वाचा –  ‘पुणे जिल्हा शिक्षण मंडळ’ अजितदादांच्या दूरदृष्टीचे प्रतीक

लातूर, परभणी, जालना आणि बीड जिल्ह्यांत विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि पंढरपूर परिसरातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अहिल्यानगरमध्येही पावसाची शक्यता असून कोकणपट्टा, राधानगरी आणि पुणे परिसरात काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो. नाशिकच्या काही भागांतही पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत 26, 27 आणि 28 ऑगस्टदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.

राज्यातील पावसाची स्थिती स्थानिक हवामान परिस्थितीनुसार बदलू शकते. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी स्थानिक हवामान अंदाज लक्षात घेऊन आवश्यक नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *