श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; जडेजाचे २६२ दिवसांनंतर पुनरागमन!

IND vs SL | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत भारतीय संघाची धुरा युवा फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आली असून केएल राहुल उपकर्णधाराची भूमिका बजावणार आहे. या संघात अष्टपैलू रवींद्र जडेजाचे तब्बल आठ महिन्यांनंतर (२६२ दिवसांनी) पुनरागमन झाले असून, फिरकी गोलंदाज सारांश जैनला पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात स्थान मिळाले आहे.
रवींद्र जडेजाने त्याचा शेवटचा कसोटी सामना २६ नोव्हेंबर २०२५ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला काही काळ संघाबाहेर राहावे लागले होते. १५ ऑगस्ट रोजी जेव्हा भारतीय संघ पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल, तेव्हा जडेजाचे तब्बल २६२ दिवसांनंतर कसोटी संघात पुनरागमन झालेले दिसेल. तर दुसरीकडे, घरगुती क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सारांश जैनला प्रथमच भारतीय कसोटी संघात स्थान मिळाल्याने त्याच्यासाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
हेही वाचा
पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात झळकणार त्यागमूर्ती माता रमाईंचे तैलचित्र..!
बुमराह आणि सुदर्शनची उपलब्धता तंदुरुस्तीवर अवलंबून
स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र त्यांचा सहभाग हा तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर बुमराहला गुडघ्याची दुखापत झाली होती. ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’कडून (CoE) तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच या दोघांचा अंतिम ११ मध्ये समावेश केला जाईल. याशिवाय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर निवडीसाठी अनुपलब्ध असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
भारतीय कसोटी संघ:
शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन*, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह*, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन.
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेचे वेळापत्रक:
- पहिला कसोटी सामना: १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट २०२७ (स्थळ: गॉल स्टेडियम)
- दुसरा कसोटी सामना: २३ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२७ (स्थळ: कोलंबो)





