TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान नव्या पिढीसाठी प्रेरणादायी’; राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मेघाश्रेय फाउंडेशनच्या ‘सर्वोत्तम नागरिक सन्मान-२०२६’मध्ये विविध क्षेत्रांतील १८ मान्यवरांचा गौरव

मुंबई : समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही केवळ गौरवाची बाब नसून, त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

मेघाश्रेय फाउंडेशनतर्फे अ‍ॅस्टर बॉलरूम, द सेंट रेजिस हॉटेल, मुंबई येथे आयोजित ‘सर्वोत्तम नागरिक सन्मान-२०२६’ सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, रा. स्व. संघाचे अखिल भारतीय संघटन प्रभारी रामलाल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

विविध क्षेत्रांतील १८ मान्यवरांचा गौरव

विज्ञान, संशोधन, संरक्षण, शिक्षण, आरोग्य, संगीत, कला-संस्कृती, चित्रपट, सामाजिक कार्य आणि अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १८ मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

यामध्ये हरिहरन, प्रा. ज्येष्ठराज भालचंद्र जोशी, मानद कॅप्टन योगेंद्र सिंह यादव, जया किशोरी, रवी किशन, लक्ष्मी अग्रवाल, संजीव कपूर, अशोक सराफ, डॉ. देवांश धनगर, सलीम मर्चंट, सुजय जयराज, डॉ. जलील डी. पारकर, केदार जोशी, सुभाष घई, अभिमन्यू सिंह, अहमद खान, भूमी पेडणेकर आणि अभिषेक सिंह यांचा समावेश आहे.

हेही वाचा –  यशस्वी जैस्वाल अडचणीत; श्रीलंकन गोलंदाजासोबतच्या झटापटीमुळे Level-4 कारवाईची टांगती तलवार

ज्ञान-विज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी व्हावा

यशस्वी व्यक्तींचे एकत्र येणे ही विशेष बाब असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. केवळ वैयक्तिक यश मिळवणे महत्त्वाचे नसून ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी आणि प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

भारतीय संस्कृतीत ज्ञान आणि विज्ञानाला विशेष महत्त्व आहे. शिस्त ही बंधन नसून स्वातंत्र्याकडे नेणारी शक्ती आहे. विविधतेचा स्वीकार आणि परस्पर सन्मानातून समाज अधिक सक्षम होतो, असेही राज्यपालांनी स्पष्ट केले.

मनाला पटणाऱ्या मार्गावर चालणारेच सर्वोत्तम नागरिक

मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जीवनात अनेकदा दोन मार्ग समोर येतात, असे सांगितले. एक मार्ग लवकर यशाकडे घेऊन जातो, तर दुसरा मार्ग मनाला पटणारा असतो; मात्र त्यासाठी अधिक वेळ आणि संघर्ष करावा लागतो. मनापासून योग्य वाटणाऱ्या मार्गावर आत्मविश्वासाने चालणारेच खरे ‘सर्वोत्तम नागरिक’ ठरतात, असे शेलार यांनी सांगितले.

युवा पिढीला प्रेरणा देण्याचा उपक्रम

मेघाश्रेय फाउंडेशनच्या संस्थापक सीमा सिंग यांनी उपक्रमाची भूमिका स्पष्ट केली. समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करून त्यांचा प्रेरणादायी प्रवास युवा पिढीसमोर आणणे हा ‘सर्वोत्तम नागरिक सन्मान’चा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष असून, उत्कृष्टता, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रसेवेची भावना वाढीस लागावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे आयोजकांनी नमूद केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button