दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला बेड्या

पिंपरी-चिंचवड | शहरातील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ६१ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), पोक्सो (POCSO) कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे परिसरात राहणाऱ्या तक्रारदार महिलेच्या १० वर्षीय आणि ४ वर्षीय मुलींवर आरोपीने मे २०२६ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीला पीडित कुटुंब अनुसूचित जातीतील असल्याची माहिती असूनही त्याने हा गुन्हा केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.
हेही वाचा
पवना धरण १०० टक्के भरले; पाणी कपात तात्काळ रद्द करा!
पीडित मुलींपैकी एका मुलीच्या पोटात वारंवार दुखू लागल्यानंतर कुटुंबीयांना संशय आला. मुलींशी संवाद साधल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पीडित कुटुंबीयांसह संतप्त नागरिकांनी रविवारी रात्री वाकड पोलीस ठाण्यात मोठी गर्दी करत आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७६/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता कलम ६४(२), ६५(२), ७४, ७६, ३५१(३), POCSO कायद्याचे कलम ४, ६, ८, १२ तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम कलम ३(२)(v)(va) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.





