राज्यात ‘या’ तारखेपासून मान्सूनच्या प्रवासाला वेग, काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मुंबई: दक्षिण कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे ८ जून पासून एकाच जागी स्थिर असणारा मान्सून आता हळूहळू पुढे सरकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात मान्सून राज्यातील इतर भागातही वाटचाल करण्याचा अंदाज शनिवारी हवामान विभागाने व्यक्त केला असून राज्यातील काही भागात येत्या काही दिवसांत मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज आहे. तसेच राज्यातील अंतर्गत भागातही मान्सून मजल मारू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष राज्यातील इतर भागात मान्सून केव्हा दाखल होतो याकडे लागले आहे. मागील काही दिवसांपासून हवामान स्थिती अनुकूल नसल्याने त्याचा परिणाम मान्सूनच्या वाटचालीवर झालेला दिसून येत आहे. त्यामुळे ६ जून रोजी तळकोकणात दाखल झालेल्या मान्सूनने केवळ हर्णे आणि सोलापूरपर्यंत मजल मारली होती. मात्र, त्यानंतर त्याची वाटचाल रखडली आहे. सध्या बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मान्सूनच्या पुढील वाटचालीला गती देणारी हवामान प्रणाली सक्रिय होण्याचा अंदाज असून त्यामुळे मान्सून राज्यातील आणखीन काही भागात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हवामान विभागाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, २३ जूनपासून मान्सून महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे लवकरच मान्सून राज्यातील आणखीन काही भागात वाटचाल करण्याचा अंदाज आहे. तसे झाल्यास दीर्घ काळ उष्णतेचा सामान करणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.
हेही वाचा – जिओच्या IPO ची मोठी घोषणा! मुकेश अंबानींचा ऐतिहासिक निर्णय; सेबीकडे आजच DRHP दाखल
हवामान विभागाने पुढील काही आठवड्याच्या हवामानाचे अंदाज प्रसिद्ध केले असून त्यानुसार २५ जून ते २ जुलै या दरम्यान राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या दरम्यान कोकण प्रदेशात पावसाचा जोर अधिक असण्याचा अंदाज आहे.
सोलापूर, सिंधूदुर्ग तसेच कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग आदी भागांना हवामान विभागाकडून आज ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि पुणे घाट विभाग, सातारा आणि सातारा घाट विभाग, सांगली, धाराशिव, लातूर आणि नांदेड आदी भागात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांश भागात आज उष्णेतच्या लाटेसदृश्य स्थिती राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे.





