Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी

जिओच्या IPO ची मोठी घोषणा! मुकेश अंबानींचा ऐतिहासिक निर्णय; सेबीकडे आजच DRHP दाखल

Jio IPO Approved: भारतीय शेअर बाजारातील सर्वात चर्चित आणि बहुप्रतीक्षित आयपीओंपैकी एक असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओबाबत मोठी बातमी समोर आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी जिओच्या आयपीओला संचालक मंडळाची मंजुरी मिळाल्याची घोषणा केली आहे.

रिलायन्सच्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) बोलताना अंबानी यांनी सांगितले की, जिओ प्लॅटफॉर्म्सच्या संचालक मंडळाने ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मंजूर केला असून तो आजच भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडे (SEBI) दाखल केला जाणार आहे.

या आयपीओअंतर्गत 10 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या तब्बल 27 कोटी नवीन इक्विटी शेअर्सची विक्री करण्यात येणार आहे. शेअरची अंतिम किंमत बुक-बिल्डिंग प्रक्रियेद्वारे निश्चित केली जाणार असून सेबीच्या नियमांनुसार संपूर्ण प्रक्रिया पार पडेल.

दरम्यान, जिओच्या कामगिरीबाबतही अंबानी कुटुंबाने AGM मध्ये महत्त्वाची माहिती दिली. रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जिओच्या ग्राहकसंख्येने 52.4 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर कंपनीचा करानंतरचा नफा (PAT) प्रथमच 30 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे.

जिओच्या 5G सेवांनाही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कंपनीचे 5G ग्राहक आता 26.8 कोटींवर पोहोचले असून आर्थिक वर्षात 7.7 कोटी नवीन 5G ग्राहक जोडले गेले आहेत. चीनबाहेरील सर्वात मोठे सिंगल-कंट्री 5G नेटवर्क ऑपरेटर म्हणून जिओने आपले स्थान मजबूत केले आहे.

हेही वाचा –  टीम इंडियासाठी वाईट बातमी, आयर्लंडविरुद्ध मालिकेतून तगडा खेळाडू बाहेर; बीसीसीआयकडून माहिती समोर

फिक्स्ड ब्रॉडबँड क्षेत्रातही जिओ एअरफायबर वेगाने विस्तारत आहे. सध्या देशभरातील 1.3 कोटींहून अधिक घरांना ही सेवा जोडली गेली असून ग्रामीण आणि दुर्लक्षित भागांमध्ये इंटरनेट पोहोचवण्यात तिची महत्त्वाची भूमिका आहे.

आर्थिक कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास, जिओ प्लॅटफॉर्म्सचा महसूल 14.6 टक्क्यांनी वाढून 1.46 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर EBITDA 18.8 टक्क्यांनी वाढून 76,255 कोटी रुपयांवर गेला आहे. कंपनीचा EBITDA मार्जिनही 51.9 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

जिओच्या आयपीओची घोषणा झाल्यानंतर आता गुंतवणूकदारांचे लक्ष या सार्वजनिक शेअर्स विक्रीकडे लागले आहे. भारतातील डिजिटल क्रांतीचा चेहरा बनलेल्या जिओच्या आयपीओला बाजारातून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

मुकेश अंबानी यांच्या या घोषणेमुळे भारतीय भांडवली बाजारात आणखी एक मोठी ऐतिहासिक नोंद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button