पीकविमा उत्पादनाच्या निकषात तफावत; प्रत्यक्ष आणि तांत्रिक उत्पादनाची फेरपडताळणी करण्याची फडणवीसांची मागणी
पीक कापणी प्रयोगात मानवी हस्तक्षेप झाला का, तांत्रिक उत्पादनात चुका झाल्या का? केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे पत्राद्वारे मांडले प्रश्न

मुंबई : पीकविमा योजनेत प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगातून समोर आलेले उत्पादन आणि तांत्रिक पद्धतीने निश्चित केलेले उत्पादन यामध्ये मोठी तफावत आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे या प्रक्रियेची फेरपडताळणी करण्याची मागणी केली आहे. फडणवीस यांनी २२ सप्टेंबर रोजी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र पाठवून उत्पादन निश्चित करण्याच्या निकषांमधील त्रुटींवर मार्ग काढण्याची विनंती केली आहे.
गतवर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते. विशेषतः वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये काही पिकांचे प्रत्यक्ष उत्पादन कमी, तर तांत्रिक पद्धतीने निश्चित केलेले उत्पादन तुलनेने जास्त असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पीकविमा नुकसानभरपाई निश्चित करताना दोन्ही पद्धतींमधील तफावत महत्त्वाची ठरते.
खरीप हंगामातील भात, सोयाबीन, कापूस तसेच रब्बीतील गहू या पिकांसाठी पीक कापणी प्रयोगातून मिळणारे उत्पादन आणि तांत्रिक पद्धतीने निश्चित होणारे उत्पादन या दोन्हींचा निकषात समावेश केला जातो. दोन्ही पद्धतींमधून उत्पादन कमी आल्यास संबंधित पिकाला विमा योजनेचा लाभ मिळण्याची तरतूद आहे.
फडणवीस यांनी आपल्या पत्रात तांत्रिक उत्पादन निश्चित करताना काही त्रुटी झाल्या आहेत का, तसेच पीक कापणी प्रयोगाच्या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप झाला आहे का, याची तपासणी करण्याची गरज व्यक्त केली आहे. भविष्यात प्रत्यक्ष आणि तांत्रिक उत्पादनाच्या अंदाजात मोठी तफावत निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेने कार्यपद्धतीत सुधारणा करावी किंवा फेरपडताळणीची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा – दिशा सालियान प्रकरणात ५०० कोटींच्या नोटिशीला आदित्य ठाकरेंचे उत्तर; सर्व आरोप फेटाळले
गतवर्षी राज्यात सुमारे ९६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने मोठ्या प्रमाणावर मदत द्यावी लागली होती. त्याचवेळी काही पिकांचे उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचे आकडे समोर आल्याने हमीभावाच्या खरेदीसह विविध योजनांचे नियोजन करताना अडचणी निर्माण झाल्याचे फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
उपग्रह प्रतिमांवरच उत्पादनाचा अंदाज नको
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही पीक उत्पादनाचा अंदाज केवळ उपग्रह प्रतिमांवर आधारित ठेवण्याबाबत सावध भूमिका मांडली आहे. काही भागांत पाऊस झाल्यानंतर पिके वरून हिरवी दिसत असली, तरी प्रत्यक्ष शेतात शेंगा भरलेल्या नसणे किंवा दाणे अपुरे असण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ पिकांचा हिरवा रंग पाहून उत्पादन चांगले राहील, असा निष्कर्ष काढता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यंदाच्या दुष्काळसदृश परिस्थितीतही अनेक पिके वरून हिरवी दिसत असली तरी प्रत्यक्ष उत्पादन कमी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीक कापणी प्रयोग, प्रत्यक्ष क्षेत्रभेट आणि स्थळपाहणीतील निरीक्षणे महत्त्वाची ठरणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य सरकारने यंदा दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग सुरू केले असून ते अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पीक उत्पादनाचे अचूक मूल्यांकन झाल्यास पीकविमा नुकसानभरपाईसोबतच हमीभाव खरेदी, मदत योजना आणि कृषी नियोजनासाठीही अधिक अचूक आकडेवारी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.





