राज्यात धोss धोss पाऊस!
सावधान! राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज, 9 जुलैपर्यंत अति मुसळधार पावसाचा इशारा!

पुणे / मुंबई : महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दि. 9 जुलैपर्यंत सर्वत्र धो ss धो ss पाऊस अक्षरशः धुमाकूळ घालेल, असा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यात दि. 9 जुलैपर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे .
मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा..
मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर तसेच मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी राहील. या कालावधीत तळ कोकणापासून संपूर्ण किनारपट्टी भागात पावसाचे ऑरेंज अलर्ट आहेत .मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरावर जोरदार पावसाची शक्यता आहे . उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
मुंबईत मुसळधार, राज्यालाही झोडपले !
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यातील अनेक भागांमध्ये रविवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला.अंधेरीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सब-वेमध्ये पाणी साचल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे चित्र आहे.
पालघर,वसई, विरारला झोडपले..
दुसरीकडे पालघर जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. वसई आणि विराराला पावसाने चांगलेच झोडपले आहे. या पावसामुळे सायंकाळी घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, रात्री देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – राज्यात उद्या आणि परवा शाळा बंद राहणार नाहीत, शिक्षण विभागाने काढले आदेश
कल्याण, डोंबिवलीतही मुसळधार!
दरम्यान, रविवार सकाळपासून कल्याण आणि डोंबिवली परिसरात पावसाची रिपरिप सुरू होती. काही वेळा हलक्या सरी तर अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी पडल्या.
भिवंडीतही धुंवाधार पाऊस..
भिवंडीत दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील, तीनबत्ती बाजारपेठेमध्ये पाणी साचले आहे. अनेक छोट्या-मोठ्या दुकानात पाणी शिरल्याचा घटना देखील घडल्या. या पावसामुळे व्यावसायिकांचे चांगलेच हाल झाले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ..
नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर रामकुंडातील पाणी वाढले आहे.
पुणे जिल्ह्यातही पावसाची संततधार !
पुणे शहर, पिंपरी चिंचवड त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार असून सखल भागात पाणी चांगलेच साठले आहे आणि नागरिकांचे हात होत आहेत. खेडोपाडी मात्र शेतकऱ्यांच्या पिकांचे बऱ्यापैकी नुकसान झाले असून हाल झाल्याचे शेतकरी वर्ग सांगत असून चांगलाच चिंतेत आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय ?
प्रादेशिक हवामान केंद्र आणि पृथ्वी मंत्रालयाने एकत्रितपणे जाहीर केलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार, दि. 9 जुलैपर्यंत महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे पश्चिम बंगाल व आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्याच्या पावसाची हजेरी राहणार आहे . यावेळी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. पुढील दोन दिवस पुणे, घाटमाथ्यावर पुन्हा एकदा रेड अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे.
पावसाचा जोर कुठे राहील?
दि.7 जुलै : पुणे, घाटमाथ्यावर रेड अलर्ट, त्याचप्रमाणे, रत्नागिरी, रायगड,भंडारा गोंदिया,नाशिक व साताऱ्याचा घाटमाथा येथे ऑरेंज अलर्ट!मुंबई, ठाणे ,पालघर, नाशिक, नंदुरबार ,धुळे ,जळगाव ,छत्रपती संभाजीनगर, जालना ,परभणी, हिंगोली, नांदेड,नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी ऑरेंज अलर्ट! दि. 8 जुलै : रत्नागिरी, गोंदिया आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, रायगड सिंधुदुर्ग नागपूर ,भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली तसेच कोल्हापूर आणि पुणे घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट राहील.
दि. 9 जुलै : तळ कोकणासह पुढे सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावरील पावसाचा यलो अलर्ट, नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचाही समावेश आहे.





