‘गरीब रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून निधी द्या’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
रुबी हॉल क्लिनिकसोबत बैठक; पुण्यात कमी खर्चात प्रोटॉन थेरपी सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा

मुंबई : गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतून मिळणाऱ्या निधीपेक्षा अधिक खर्च येत असल्यास अतिरिक्त रक्कम कॉर्पस फंडातून उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपणाच्या मोहिमेला अधिक गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर होते.
रुबी हॉल क्लिनिक या अंगीकृत रुग्णालयात कार्डियाक आणि कॅन्सर उपचारांच्या सुविधा महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
खासगी रुग्णालये आणि शासकीय आरोग्य योजनांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आबिटकर यांनी दिले.
हेही वाचा – गॉल कसोटीत भारताला फिरकीचा फटका; दुसऱ्या दिवशी चार विकेट्स गमावल्या
पश्चिम महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील तसेच ग्रामीण रुग्णांच्या सोयीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर सुरू करण्याचे नियोजन आहे.
या केंद्रात सीटी स्कॅन, एक्स-रे, ईसीजी, टू-डी इको आणि यूएसजी यांसारख्या निदान सुविधा माफक दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे संबंधित भागातील रुग्णांना तपासण्यांसाठी पुणे किंवा मुंबई गाठण्याची गरज कमी होणार आहे.
कर्करोगावरील प्रोटॉन थेरपीची सुविधा सध्या महाराष्ट्रात मुंबईत उपलब्ध असल्याने राज्यातील अनेक रुग्णांना या उपचारासाठी मोठा खर्च आणि प्रवास करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन रुबी हॉल क्लिनिक आणि राज्याच्या आरोग्य विभागाच्या समन्वयातून पुण्यात कमी खर्चात प्रोटॉन थेरपीची अत्याधुनिक सुविधा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
बैठकीला रुबी हॉल रुग्णालयाचे विश्वस्त परवेझ ग्रँट, डॉ. सायमन ग्रँड, मुख्य कार्यकारी अधिकारी मुदित सक्सेना, जनरल मॅनेजर सचिन दंडवते, पूनम चव्हाण यांच्यासह आरोग्य विभागाचे सहसचिव मिलिंद कदम, वैद्यकीय सहायता कक्षाचे कौस्तुभ थोरात, प्रसाद बिराजदार आणि गणेश तिकोने उपस्थित होते.





