गॉल कसोटीत भारताला फिरकीचा फटका; दुसऱ्या दिवशी चार विकेट्स गमावल्या
पावसानंतर खेळपट्टी फिरकीला अनुकूल; पडिक्कल, राहुल, पंत आणि जडेजा बाद, श्रीलंकेचे सामन्यात दमदार पुनरागमन

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी श्रीलंकेने जोरदार पुनरागमन केले आहे. पहिल्या दिवशी फलंदाजांच्या जोरावर वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या दिवशी श्रीलंकन फिरकीपटूंचा सामना करताना मोठी अडचण आली. पावसानंतर खेळपट्टी फिरकीला अनुकूल झाल्याचे दिसून आले असून, भारताने झटपट चार महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या २ बाद २८८ होती. देवदत्त पडिक्कल १३१ धावांवर, तर ऋषभ पंत २७ धावांवर नाबाद होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारत मोठी धावसंख्या उभारेल, अशी अपेक्षा होती.
मात्र, दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत पावसामुळे एकही चेंडू टाकला गेला नाही. त्यानंतर खेळ सुरू झाल्यावर भारतीय फलंदाजांना श्रीलंकन फिरकीचा सामना करणे कठीण गेले.
लंचनंतर भारताला पहिला धक्का ऋषभ पंतच्या रूपाने बसला. ३९ धावांवर केशारा नुवांथाने त्याला बाद केले. त्यानंतर रिटायर्ड हर्ट झालेला केएल राहुल पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र, ८२ धावांवर नुवांथानेच राहुलचा त्रिफळा उडवला.
हेही वाचा – महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
यानंतर दमदार फलंदाजी करणारा देवदत्त पडिक्कलही मोठी खेळी करून बाद झाला. १६७ धावांवर प्रभात जयसूर्याने त्याला माघारी धाडले.
सेट झालेले फलंदाज एकापाठोपाठ बाद झाल्याने भारताची स्थिती काहीशी अडचणीत आली. डाव सावरण्याची जबाबदारी ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांच्यावर आली होती. मात्र, १३ धावांवर जडेजालाही केशारा नुवांथाने बाद केले.
भारताच्या चारही विकेट्स फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर पडल्याने पावसानंतर गॉलची खेळपट्टी फिरकीला मोठी साथ देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पहिल्या दिवशी भारताने आक्रमक फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारण्याची चिन्हे दाखवली होती. दुसऱ्या दिवशी मात्र पाऊस आणि त्यानंतर प्रभावी ठरलेली श्रीलंकन फिरकी यामुळे भारताच्या धावगतीला ब्रेक लागला. ५०० धावांचा टप्पा गाठण्याची अपेक्षा असताना भारतीय संघाला आता सावध फलंदाजी करावी लागणार आहे.
दरम्यान, भारतीय फलंदाजांना अडचणीत आणल्यानंतर श्रीलंकेने सामन्यात दमदार कमबॅक केले आहे. आता भारतीय फिरकीपटूंवरही श्रीलंकेच्या फलंदाजांना रोखण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.





