TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘दहीहंडीला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करणार’; सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार

गोविंदांना स्पेनमध्ये पाठवणार; उत्सवातील सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वाचा उत्सव असलेल्या दहीहंडीला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळावे, यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. तसेच महाराष्ट्रातील गोविंदा पथकांना स्पेनमध्ये पाठवण्याची घोषणाही त्यांनी केली.

महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या वतीने परळ येथील राष्ट्रीय मजदूर मिल संघात ‘कृष्णानंद सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना शेलार यांनी ही माहिती दिली. यावेळी राज्यातील महिला व पुरुष दहीहंडी पथकांचे प्रतिनिधी, गोविंदा तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दहीहंडी उत्सव अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन शेलार यांनी केले. गोविंदा पथकांनी सुरक्षेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, आवश्यक खबरदारी घ्यावी तसेच रहदारी आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  ‘गरीब रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून निधी द्या’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

उत्सवादरम्यान पादचारी आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याचीही मंडळांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. गोविंदांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह द्विगुणित करण्याच्या उद्देशाने ‘कृष्णानंद सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शेलार यांनी विविध पारंपरिक सण-उत्सवांवर निर्बंध आणण्याच्या मागण्यांवरही भाष्य केले. गणेशोत्सव, नागपंचमी आणि दहीहंडी उत्सवाच्या आयोजनावर सातत्याने विविध प्रकारच्या मर्यादा आणल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले.

पर्यावरण, नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीच्या प्रश्नांचा विचार करणे आवश्यक आहे. मात्र, एकामागून एक निर्बंध आणून पारंपरिक उत्सवांना बंदीच्या दिशेने नेण्याची भूमिका योग्य नसल्याचे शेलार म्हणाले.

“मराठी मातीतल्या, मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या सणांवर सातत्याने निर्बंध आणण्याची भूमिका दिसते. मात्र बंदीचा निर्णय आम्हाला मान्य नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

पारंपरिक उत्सवांवर मर्यादा आणण्याची मागणी करणाऱ्यांवर टीका करताना शेलार यांनी गंभीर सवाल उपस्थित केला. अशा प्रकारच्या मर्यादा आणि बंदी आणण्यापर्यंतची भूमिका मांडणारे लोक शहरी नक्षलवादाशी जोडलेले आहेत का, असा थेट आरोप त्यांनी केला.

कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे अध्यक्ष बाळा पडेलकर, कार्याध्यक्ष सुरेंद्र पांचाळ, सचिव गीता झगडे, अभिषेक सुर्वे यांच्यासह विविध दहीहंडी पथकांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button