ताज्या घडामोडीमुंबई

मोहरमनिमित्त स्वारींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी

मोहरम विसर्जन मिरवणूक उत्साहात, सर्व धर्मियांचा सहभाग

अहिल्यानगर : राज्यभर प्रसिद्ध असलेली अहिल्यानगरची मोहरम मिरवणूक आज शांततेत व उत्साहात पार पडली. शनिवारी (ता. ५) मध्यरात्री काढण्यात आलेली कत्तलची रात्र मिरवणूक रविवारी (ता. ६) सकाळी साडेदहा पर्यंत चालली. त्यानंतर दुपारी मोहरम विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. ही मिरवणूकही सुमारे नऊ तास चालली. सर्व धर्मियांच्या उपस्थितीत ही मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडली. रात्री नऊच्या सुमारास मिरवणूक दिल्लीगेटच्या बाहेर पडली.

मोहरमनिमित्त कोठला परिसरात स्वारींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी रात्री १२ वाजता कोठला येथील छोटे बारा इमाम यांची स्वारी उठल्यानंतर कत्तलची रात्र मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी मानाचे पाच टेंभे पेटविण्यात आले होते. मंगलगेट हवेली येथून मोठे बारा इमाम यांची स्वारी उठली. कत्तलची रात्र मिरवणूक डाळमंडई, तेलीखुंट, कापडबाजार, मोची गल्ली, भिंगारवाला चौक, लक्ष्मी कारंजा, पटवर्धन चौक, जुने कोर्ट, जुना बाजार, ईदगाह मैदान मार्गेकोठला येथे रविवारी सकाळी स्वारी परत आपल्या जागेवर बसविण्यात आली.

हेही वाचा – राज्यात उद्या आणि परवा शाळा बंद राहणार नाहीत, शिक्षण विभागाने काढले आदेश

पुन्हा दुपारी १२ च्या सुमारास कोठला येथील हमामे हुसेन यांची सवारी उठवून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. आडते बाजार, पिंजार गल्ली, पारशा खुंट, जुना बाजार, खिस्त गल्ली, बांबू गल्ली, पंचपीर चावडी, सबजेल चौक मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चौकाचौकांत पोलिस तैनात होते, तर संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. संपूर्ण मोहरम मार्गावर पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेली होती. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह सर्व अधिकारी मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता मिरवणूक शांततेत पार पडली.

मंगल गेटला दोन्ही स्वाऱ्या एकत्र
कोठला येथून छोटे बारा इमाम (इमामे हुसेन) यांची सवारी हवेली येथे आल्यानंतर मोठे बारा इमाम (इमामे हसन) यांची सवारी देखील उठविण्यात आली. इमामे हसन-हुसेन या स्वाऱ्या हवेली येथून एकत्रित बाहेर पडल्या. मंगल गेट येथे दोन्ही स्वाऱ्या एकत्र आल्या असता, भाविकांनी एकच जल्लोष केला. मिरवणूक पाहण्यासाठी व स्वाऱ्यांच्या दर्शनासाठी सर्व धर्मियांनी मोठी गर्दी केली होती.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
मिरवणुकीदरम्यान दुपारी दीडच्या सुमारास जुमा मशिदीत दुवा मागण्यात आली. यावेळी हिंदू- मुस्लिम ऐक्य दिसून आले. हिंदू बांधवांनी सरबताचे वाटप केले. तसेच मिरवणुकीत सहभागी होत हिंदू- मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला. दरम्यान, सायंकाळी स्वारींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पाच सरबताच्या गाड्या जुन्या महानगरपालिकेपर्यंत मिरवणुकीत सहभागी होत्या.

बंदोबस्तासाठी एक हजार पोलिस
मिरवणूक वेळेत दिल्ली गेट बाहेर पडण्यासाठी सवारी खेळविणाऱ्या यंग पार्ट्यांना वेळेचे बंधन घालून देण्यात आले होते. संवेदनशील ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात होता. सुमारे एक हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. त्यात पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, निरीक्षक अशा ७० अधिकाऱ्यांचा समावेश होता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button