ताज्या घडामोडीमुंबई

मुंबईसह १४ महापालिका, २५ जि.प. निवडणुकांची तयारी ; निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांशी चर्चा

मुंबई | मुंबईसह १४ महानगरपलिका, नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा व २८४ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी बुधवारी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत चर्चा केली. साधारणत: एप्रिल व मे महिन्यांत वेगवेगळय़ा टप्प्यांत या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आयुक्त मदान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला भारतीय जनता पक्ष, इंदिरा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्ष, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रतिनिधी हजर होते. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर आणि उपायुक्त अविनाश सणस उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी विविध सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. राजकीय पक्ष नोंदणीपासून तर त्यांचे विविध अहवाल सादर करण्यापर्यंतची सर्व सुविधा लवकरच ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अद्ययावत माहितीकरिता आयोगाच्या संकेतस्थळासह उमेदवारांसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा असेल. त्याचबरोबर उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठी, मतदारांना उमेदवारांबाबत माहिती जाणून घेण्यासाठी; तसेच मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी ट्रू व्होटर मोबाइल अ‍ॅपचीही सुविधा असेल, अशी माहिती मदान यांनी या वेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button