ताज्या घडामोडीमुंबई

ठाणेकरांवर पाणी संकट; पिसे बंधाऱ्यातून आठवडाभर ५० टक्के पाणी कपात

ठाणे | भातसा धरणाच्या दरवाजामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पुढील दोन दिवस ठाणे शहराला ५० टक्के कमी पाणी पुरवठा होणार आहे. या बिघाडाच्या दुरुस्तीस आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या कामानंतरच शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्यामुळे ठाणेकरांना किमान आठवडाभर पाणी संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाणी टंचाईची झळ कमी व्हावी यासाठी महापालिकेने उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे विभागावार नवे नियोजन करून ठाणेकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्रोतामार्फत दररोज ४८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये स्टेम प्राधिकरण, महापालिकेची स्वत:ची योजना, एमआयडीसी आणि मुंबई महापालिका या स्रोतांचा समावेश आहे. ४८५ पैकी २०० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून करण्यात येतो. त्यासाठी पालिका भातसा धरणाच्या पिसे बंधाऱ्यातून पाणी उचलते.

भातसा धरणाच्या दरवाजामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला असून त्याचा परिणाम ठाणे शहरातील पाणी पुरवठय़ावर झाला आहे. या बिघाडामुळे पुढील दोन दिवस ठाणे शहराला ५० टक्के कमी पाणी पुरवठा होणार असल्याचा दावा पालिकेने केला होता. प्रत्यक्षात मात्र दुरुस्ती कामासाठी किमान आठ दिवसांचा कालावधी लागणार असून तोपर्यंत ठाणे शहराला ५० टक्के कमी पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून दररोज २०० ऐवजी १०० दशलक्षलीटर इतकाच पाणी पुरवठा होणार आहे. महापालिकेच्या योजनेतून ठाणे शहर, घोडबंदर परिसर आणि कळवा भागात पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे ठाणेकरांना उन्हाळय़ात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

पाण्याचे विभागवार नियोजन

गुरुवारपासून दररोज सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, माजिवाडा, मानपाडा, बाळकुंभ, कोळशेत, हिरानंदानी इस्टेट, ढोकाळी, वाघबिळ, ब्रह्मांड, विजयनगरी, गांधीनगर, कासारवडवली, ओवळा, सिद्धांचल, सुरकुरपाडा, उन्नती या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर गुरुवारपासून रात्री ९ ते सकाळी ९ वाजेपर्यंत दररोज इटरनिटी, जॉन्सन, समता नगर, सिद्धेश्वर, दोस्ती, आकृती, कळवा, मुंब्रा, जेल, साकेत, ऋतुपार्क, रुस्तमजी या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या दरवाजामध्ये तांत्रिक बिघाड झाला असून या दुरुस्ती कामामुळे किमान आठ दिवस शहराला कमी पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. या काळात ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे विभागवार १२ तासांचे नियोजन केले आहे. -विनोद पवार, उपनगर अभियंता, ठाणे महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button