breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

धक्कादायक! ‘त्यांचे’ लग्न ठरले, पत्रिकाही वाटल्या, हळदीचा कार्यक्रम सुरू झाला, इतक्यात मुलीने…

पुणे : लग्न जमविण्यासाठी दोन्ही कुटुंबे भेटली…दोघांनी एकमेकांना पसंतीही दिली…सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला…त्यानंतर एक मे रोजी लग्नाचा मुहूर्तही ठरला…लग्नपत्रिकांचे वाटपही झाले…वराच्या घरी २९ एप्रिलला हळदीचा कार्यक्रम उत्साहात सुरू होता… इतक्यात मुलीचे वडील, आई आणि भाऊ हजर झाले आणि त्यांनी मुलीने लग्नघरातून धूम ठोकल्याची ‘वार्ता’ दिली. ते ऐकून वराकडील सर्व मंडळींच्या छातीत धस्स झाले…आपली फसवणूक झाली असे वाटल्याने त्यांनी नियोजित वधूच्या आई-वडिलांसह भावावर गुन्हा दाखल केला. (the bride ran away two days before the wedding)

लग्नाच्या दोनच दिवस आधी पळून गेलेल्या वधूमुळे तिचे आई-वडील आणि भावावर संकट कोसळल्याची घटना लोहगाव परिसरात घडली. पसंतीने लग्न ठरूनही तिने ऐनवेळी घरातून पळ काढल्याचा धक्का वराकडील मंडळींना सहन न झाल्याने त्यांनी चिडून झालेल्या खर्चापोटी एक लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरा मुलगा सार्वजनिक बांधकाम विभागात चालक म्हणून कार्यरत आहे. मध्यस्थांमार्फत संबंधित मुलीचे स्थळ त्यांच्याकडे चालून आले होते. त्यानुसार दोन्हीही कुटुंबे एकमेकांना भेटली. दोघांच्या पसंतीने लग्न ठरविण्यात आले. दोन्ही कुटुंबे लग्नाच्या धामधुमीत असताना मुलीने अशा पद्धतीने धूम ठोकल्याने वराकडील मंडळी चिंतेत पडली. ऐनवेळी नवरी मुलगी गायब असल्याचे आपली बदनामी होण्याची भीती त्यांना वाटली. मुलगी गायब असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी विमानतळ पोलिस ठाण्यात नोंदवली.

‘आम्ही लग्नाची सर्व तयारी केली आहे. मात्र, हा प्रकार घडल्याने आमची समाजात आणि नातेवाइकांमध्ये बदनामी होण्याची भीती आहे. लग्नापूर्वीच मुलीकडे थेट विचारणा केली होती का,’ असा सवालही मुलाच्या कुटुंबाने मुलीच्या पालकांना केला. त्यावर ‘लग्नाच्या मुहूर्तापर्यंत मुलगी शोधण्याचा प्रयत्न करतो,’ असे म्हणून मुलीच्या नातेवाइकांनी तेथून काढता पाय घेतला. लग्नाच्या आदल्या दिवशी (३० एप्रिल) मुलगी सापडली का, याची विचारणा करण्यासाठी मुलाचे आई-वडील गेले असता, ‘आमचा अजूनही शोध सुरू आहे. तोवर तुम्ही थांबा; अन्यथा तुम्ही तुमच्या मुलाचे लग्न करू शकता. मुलगी घरी आली की तिच्या मर्जीप्रमाणे लग्न लावून देणार आहोत. सध्या मात्र, आम्ही काहीही करू शकत नाही,’ असे तिच्या पालकांनी मुलाच्या घरच्यांना सुनावल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकारानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी थेट विमानतळ पोलिस ठाणे गाठले आणि मुलीच्या पालकांविरोधात फसवणूक आणि बदनामी केल्याचा गुन्हा नोंदविला. मुलाचे लग्न ठरल्यानंतर बस्ता बांधण्यासाठी ८० हजार खर्च झाला. लग्नपत्रिकांसाठी सात हजार, लग्नाची तयारीसाठी ७५ हजार खर्च केल्याचा दाव मुलाच्या नातेवाइकांनी केला. या प्रकारामुळे नातेवाइकांमध्ये मान खाली घालण्याची वेळ आली. अशा प्रकारे एक लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button