breaking-newsराष्ट्रिय

विकास दर दुप्पट करण्याचे आव्हान

  • नीति आयोगाच्या बैठकीत पंतप्रधानांचे प्रतिपादन

नवी दिल्ली – दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या नीति आयोगाच्या बैठकीत देशापुढील समस्यांचा उहापोह करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, सन 2017-18 च्या आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीत देशाचा विकास दर 7.7 टक्के इतका झाला असून हाच विकास दर दुप्पट करण्याचे देशापुढे आव्हान आहे. त्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. भारताने टीम इंडिया स्वरूपात एकत्रितपणे विकास प्रक्रियेत योगदान दिले पाहिजे असे आवाहन करून त्यांनी म्हटले आहे की एकमेकांना सहकार्य करून व्यापक सामजंस्याच्या आधारे आपण वाटचाल केली पाहिजे. नीति आयोगाची ही चौथी बैठक असून त्या बैठकीला देशातल्या बहुतेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित आहेत. या बैठकीवर अरविंद केजरीवालांनी सुरू केलेल्या धरण्याचे सावट आहे. चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या बैठकीच्यावेळी पंतप्रधानांची भेट घेऊन दिल्लीतील घटनात्मक पेच प्रसंग सोडवण्यात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले.

यावेळी उद्‌घाटनपर भाषणात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, देशात राबवल्या जात असलेल्या मुद्रा योजना, जनधन योजना, स्टॅंडअप इंडिया अशा सारख्या योजनांमुळे लोकांचा वित्तीय समावेशनातील सहभाग वाढत आहे. आर्थिक असमतोल दूर करण्यासाठी देशात प्राधान्याने काम होण्याची गरज आहे. देशात दीड लाख आरोग्य आणि कल्याण केंद्रे उभारली जात असून देशातील दहा कोटी कुटुंबांना पाच लाख रूपयांचा आरोग्य विमा दिला जात आहे. त्याद्वारे त्यांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्चाचा भार हलका करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत देशातील शिक्षणाच्या प्रसाराचा व्यापक प्रयत्न केला जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सन 2022 पर्यंत देशात व्यापक सुधारणा करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

देशातील शेतकऱ्यांच्या समस्यांचा उल्लेख करून ते म्हणाले की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची सरकारची योजना आहे. देशातील अविकसित जिल्ह्यांचा विकास करण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्याची गरज आहे. नीति आयोग हे गर्व्हनिंग प्लॅटफॉर्म आहे त्यात सर्व राज्यांनी योगदान देऊन एकसंध विकासाचे स्वप्न साकार केले पाहिजे त्यासाठी संघ भावनेने काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. सहकार्य भावना आणि स्पर्धात्मक भावनेनेच भारतीय संघराज्याचा विकास होऊ शकतो असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button