breaking-newsताज्या घडामोडी

राजस्थानकडे निघालेल्या मजुरांना कथित समाजसेवकांची मारहाण

मालमोटार चालकांविरोधात गुन्हा

नगर : इचलकरंजी येथून राजस्थानकडे दोन मोटारीतून राजस्थानकडे  निघालेल्या परप्रांतीय मजुरांना नगर — मनमाड महामार्गावर राहुरी फॅक्टरी ( ता. राहुरी ) नजीक  पकडून प्रशासनाच्या हवाली करण्यात आले. या वेळी या मजुरांना काही तथाकथित समाजसेवकानी बेदम मारहाण केली. त्यात तिघे जखमी झाले आहेत. दरम्यान त्यांना नेणाऱ्या दोन मोटारीच्या चालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

राहुरी येथील गाडगेबाबा आश्रमशाळेत सर्व ४८ परप्रांतीय मजुरांचे विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे तहसीलदार फसीयोद्दीन सय्यद यांनी सांगितले.

याप्रकरणी अधिक माहिती अशी,की पशुखाद्याची वाहतूक करणाऱ्या  मालमोटारीतून ४८ मजूर हे मुले व महिलांसह भिलवाडा ( राजस्थान ) कडे चालले होते. नगर— मनमाड महामार्गावर राहुरी फॅक्टरीनजीक तनपुरे यांच्या पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एका धाब्यावर हे मजूर लघुशंकेकरीता उतरले.त्या वेळी त्यांना काही स्वयंसेवक व तथाकथित समाजसेवकांनी पाहिले. मोटारीच्या चालकांसह मजुरांना बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार देवळालीप्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना समजला. त्यांनी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने  तसेच पोलीस हवालदार सतीश शिरसाठ व अमोल बागुल यांना कळविले. कदम यांनी पोलिसांना बोलावून घेत त्यांना प्रशासनाच्या हवाली केले. एवढेच नाही तर त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था  केली . जखमींवर राहुरी फॅक्टरी येथे औषधोपचार करण्यात आले. देवळालीप्रवरा शहरात विविध भागात पालिकेने तपासणी नाके सुरू केले आहेत. त्या नाक्यावर स्वयंसेवक नेमले आहेत. त्यांनी मजुरांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.

स्वयंसेवकांनी मारहाण केली नाही, उलट मला तत्काळ कळविले . मजुरांची मारहाण करणारामपासून सुटका केली असे नगराध्यक्ष कदम यांनी सांगितले. या मजुरांना प्रशासनाने सुरुवातीला राहुरी फॅक्टरी येथील शाळेत व नंतर राहुरी येथील आश्रमशाळेत ठेवले आहे.

दरम्यान राहुरी पोलीस ठाण्यात हवालदार दादासाहेब दत्तात्रय रोहकले यांनी फिर्याद दिली असून मोटारीचे चालक साहिलखान अलीमहंमद (वय ३० वर्षे) व तालीमखान अब्दुल जब्बार (वय २७  वर्षे दोन्ही रा . निमका ता. नुर, जि. नेहवाल, राज्य — हरियाणा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राज्य व जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. माल वाहतूक करणाऱ्यांनी परप्रांतीय नागरिकांना घेऊन प्रवास करीत मोठी चूक केली. दरम्यान, संबंधित परप्रांतीय कामगारांना राहुरी फॅक्टरी येथील शाळेमध्ये ठेवावे लागणार आहे.  त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासन व स्वयंसेवी संस्थांकडून केली जाईल, अशी माहिती तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी दिली.

मजुरांची कैफियत

आम्ही गेली दहा वर्षे इचलकरंजी येथे कापड मिल मध्ये काम करत आहोत. आता तेथे काम नाही व खायला काही नाही. मग उपाशी मरण्यापेक्षा आपल्या गावाकडे जाऊ ,त्यांना देखील आमची काळजी लागली आहे . त्यामुळे गावाकडे पायी निघालो होतो. मालमोटारीच्या चालकाला दया आली. त्यानी आम्हाला मोटारीत  घेतले .मात्र राहुरी फॅक्टरी जवळच्या एका धाब्यावर आम्हाला बेदम मारहाण करण्यात आली. जीव वाचवण्यासाठी आम्ही शेतात पळत होतो. आमच्यापैकी चार जण जखमी झाले आहेत,  असे या मजुरांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button