breaking-newsआंतरराष्टीय

भारत-पाक अणुयुद्ध झाल्यास १२ कोटी लोकांचे बळी

  • अमेरिकेतील संशोधकांच्या अभ्यासाचा निष्कर्ष

वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तान यांच्यात अणुयुद्ध झाले, तर एका आठवडय़ाहून कमी कालावधीत ५ कोटी ते १२ कोटी लोक मृत्युमुखी पडतील. ही बळीसंख्या दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या सहा वर्षांच्या कालावधीत झालेल्या मृत्यूंपेक्षा जास्त असेल आणि त्यामुळे जगभरात वातावरणविषयक अरिष्ट ओढवेल, असे अमेरिकेतील संशोधकांनी सांगितले आहे.

भविष्यात उद्भवणाऱ्या अशा प्रकारच्या काल्पनिक संघर्षांचे काय परिणाम होतील आणि ते जगभर कसे पसरतील, याचा कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठ आणि रुटगेर्स विद्यापीठातील संशोधकांनी अभ्यास केला.

भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर या अण्वस्त्रसज्ज शेजाऱ्यांमधील तणाव वाढलेला असतानाच; सध्याच्या घडीला भारत व पाकिस्तान या दोघांकडेही प्रत्येकी सुमारे १५० अण्वस्त्रे असून, २०१५ सालापर्यंत हा आकडा दोनशेहून अधिक होण्याची शक्यता आहे, असे या संशोधकांनी म्हटले आहे.

भारत व पाकिस्तान यांच्यातील युद्धामुळे, जगातील मृत्युदर दुपटीने वाढू शकेल, असे कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील प्राध्यापक ब्रायन टून यांनी सांगितले. मानवी इतिहासात ज्याचे उदाहरण नाही, असे हे युद्ध ठरू शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अशा प्रकारच्या युद्धामुळे, केवळ बॉम्बचे लक्ष्य ठरू शकतील अशा ठिकाणांनाच नव्हे, तर संपूर्ण जगाला धोका निर्माण होईल, असे न्यू ब्रून्सविकच्या रुटगेर्स विद्यापीठातील अ‍ॅलन रोबोक यांनी सांगितले.

भारत व पाकिस्तान यांच्यात २०२५ साली युद्ध झाल्यास त्या वेळचे चित्र कसे राहील याचा ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या संशोधकांच्या अभ्यासात आढावा घेण्यात आला आहे. काश्मीरवरून या दोन शेजारी देशांमध्ये अनेक वेळा युद्धे झाली असली, तरी २०२५ सालापर्यंत त्यांच्याजवळ मिळून ४०० ते ५०० अण्वस्त्रे राहतील, असे यात नमूद करण्यात आले आहे.

हे दोन्ही देश वेगाने त्यांच्या शस्त्रागारात भर घालत आहेत. या देशांची लोकसंख्या फार मोठी असल्यामुळे अनेक लोकांना या शस्त्रांचा धोका आहे आणि सोबतीला काश्मीरच्या मुद्दय़ावर न सुटलेला संघर्ष या देशांमध्ये आहे, याकडे टून यांनी लक्ष वेधले.

जगावर प्रदूषणाचे सावट

अण्वस्त्रांचा स्फोट झाल्यास १६ ते ३६ दशलक्ष टन काजळी (कार्बनचे लहान-लहान काळे कण असलेला धूर) फेकली जाईल. ती वातावरणाच्या वरच्या भागात जाईल आणि काही आठवडय़ांतच जगभर पसरू शकेल, असा निष्कर्ष संशोधकांनी नोंदवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button