breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी ते निगडी मेट्रोचा डीपीआर तयार
पिंपरी – महापालिकेपासून निगडीपर्यंतच्या मेट्रोचा सर्वांगीण प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार झाला असून, तो सप्टेंबरमध्ये महापालिकेला सादर करण्यात येईल. या पाच किलोमीटर अंतराच्या प्रकल्पासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, चिंचवड, आकुर्डी व निगडी येथे मेट्रो स्थानके असतील, असे महामेट्रोचे मुख्य प्रकल्प अधिकारी गौतम बिऱ्हाडे यांनी सांगितले.
मेट्रो निगडीपर्यंत असावी, अशी शहरातील नागरिकांची तसेच लोकप्रतिनिधींची सुरवातीपासून मागणी आहे. याबाबत बिऱ्हाडे म्हणाले, “”पिंपरी ते निगडीदरम्यानच्या मेट्रोच्या बांधकामासाठी सुमारे 850 कोटी रुपये खर्च येणार असून, त्याव्यतिरिक्त भूसंपादनाचा खर्च येईल. या प्रकल्पाला स्वतंत्र गाडीची गरज भासणार नाही. संत मदर तेरेसा पुलानंतर काळभोरनगरपाशी चिंचवड स्थानक असेल. खंडोबाचा माळ येथे आकुर्डी स्थानक असेल, तर निगडी बस स्थानकापाशी निगडी मेट्रो स्थानक असेल. फ्रान्सच्या सिट्रा या कंपनीने डीपीआर तयार केला आहे. गेले सहा महिने ते काम सुरू आहे.”
430 वृक्षांची पुनर्लागवड
महामेट्रोतर्फे 430 वृक्षांची पुनर्लागवड करण्यात आली. त्यामध्ये महापालिका हद्दीतील 253 वृक्ष आहेत. भोसरी व अन्यत्र ते वृक्ष लावण्यात आले. औंध, तळजाई, रेंजहिल्स, दिघीतील ग्रेप सेंटर या ठिकाणी पाच हजार दोनशे वृक्ष लावण्यात आले, असे गौतम बिऱ्हाडे यांनी सांगितले.