breaking-newsआंतरराष्टीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संकल्पना मुस्लिम ब्रदरहुडसारखी

  • राहुल गांधी : डोकलाम पेच मोदी टाळू शकले असते 

लंडन -ब्रिटनच्या दौऱ्यावर असणारे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. संघाची संकल्पना अरब जगतातील मुस्लिम ब्रदरहुड संघटनेसारखी असल्याचे ते म्हणाले. मुस्लिम ब्रदरहुड ही जुनी राजकीय संघटना आहे. त्या संघटनेला काही अरब देशांमध्ये कार्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.

भारताचे स्वरूप बदलण्याचा आणि भारतीय संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न संघ करत आहे. इतर पक्षांनी कधीच भारतीय संस्थांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला नाही, असे राहुल म्हणाले. ते लंडनस्थित थिंक-टॅंक असणाऱ्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज्‌च्या सदस्यांसमोर बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीचा संबंधही त्यांनी संघाशी जोडला. नोटाबंदीची कल्पना संघाने मोदींच्या डोक्‍यात पेरली. भारतीय रिझर्व्ह बॅंकेला आणि अर्थमंत्र्यांना टाळून नोटाबंदीचा निर्णय झाला, असा दावा त्यांनी केला.

यावेळी राहुल यांनी चीन आणि पाकिस्तानवरून मोदी आणि त्यांच्या सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. काही महिन्यांपूर्वी चीनी सैनिकांनी डोकलाम भागात घुसखोरी केली. त्यामुळे भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आले. त्यातून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण करणारा डोकलाम पेच उद्भवला. तो तब्बल 73 दिवसांनी संपुष्टात आला. त्याचा संदर्भ देऊन राहुल यांनी डोकलाम पेच हा एक घटनाक्रम होता, एक प्रक्रिया होती, असे म्हटले. मोदींनी दक्षतेने ती प्रक्रिया पाहिली असती; तर ते पेच टाळू शकले असते, अशी टिप्पणी त्यांनी केली. डोकलाममध्ये अजूनही चिनी सैनिक असल्याचा दावाही त्यांनी केला.

मोदींकडे पाकिस्तानबाबत सखोल विचाराअंती बनलेले कुठलेही धोरण नाही. अर्थात, पाकिस्तानशी कुठला व्यवहार करणे अतिशय अवघड आहे. त्या देशात कुठल्याच एका संस्थेकडे संपूर्ण सत्ता नाही, अशी भूमिका राहुल यांनी मांडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button