breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर बडगा

पाणीपुरवठा खंडित करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

पावसाळ्यापूर्वी साफसफाई केल्यानंतर नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर साम, दाम, दंड नीतीचा अवलंब करावा. मात्र तरीही नाल्याकाठचे रहिवासी जुमानत नसतील, तर त्या विभागाचा पाणीपुरवठाच खंडित करावा, असा फतवा पालिकेचे नवे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत काढला. त्यामुळे आता नाल्यांमध्ये कचरा भिरकावणाऱ्यांना चाप बसू शकेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांकडून व्यक्त होऊ लागला आहे.

पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मासिक आढावा बैठकीचे मंगळवारी पालिका मुख्यालयात आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आयुक्तांनी वरील आदेश दिले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, प्रवीण दराडे, आबासाहेब जऱ्हाड, अश्विनी जोशी, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार यांच्यासह पालिकेचे उपायुक्त, साहाय्यक आयुक्त आणि खातेप्रमुख आदी उपस्थित होते.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईमधील लहान-मोठय़ा नाल्यांची सफाई केली जाते. मात्र नाल्याकाठी उभ्या असलेल्या वस्त्यांमधून सफाई केल्यानंतर नाल्यात कचरा भिरकावला जातो. त्यामुळे सफाई केल्यानंतर काही दिवसांमध्येच नाले पुन्हा कचऱ्याने भरतात. त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबतात आणि त्याचा फटका मुंबईकरांना बसतो. या प्रकाराची प्रवीणसिंह परदेशी यांनी गंभीर दखल घेतली आहे.

जनजागृती केल्यानंतरही नाल्यांमध्ये कचरा टाकण्यात येत असेल तर दंडात्मक कारवाई करावी. यासाठी नाल्याकाठच्या परिसरात मनुष्यबळ तैनात करावे. मात्र विनंती, दंडात्मक कारवाईनंतरही नागरिकांकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसेल, तर त्या परिसराचा पाणीपुरवठा खंडित करावा, असे आदेश प्रवीणसिंह परदेशी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

जनजागृती करण्याची सूचना

मुंबईतील नाल्यांची साफसफाई केल्यानंतर त्यात कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा भागातून जाणाऱ्या नाल्याच्या कडेला जाळी व फ्लोटिंग ब्रूम बसवावे. तसेच नाल्यामध्ये कचरा टाकू नये यासाठी तेथील रहिवाशांना विनंती करावी. यासाठी स्थानिक नगरसेवकांची मदत घ्यावी आणि रहिवाशांमध्ये जनजागृती करावी, असे प्रवीणसिंह परदेशी यांनी अधिकाऱ्यांना बजावले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button