breaking-newsमुंबई

नवाब मलिक यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – माजी मंत्री बबनराव लोणीकर

मुंबई – बोगस सोयाबीन बियाणे विक्री प्रकरणी आठ दिवसात ईगल सीड्स कंपनीच्या मालकासह जबाबदार अधिकाऱ्यांना अटक करू अशी वल्गना स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर परभणी जिल्‍ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी केली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र काडीचीही कारवाई करण्यात आलेली नाही. सरकार शेतकऱ्यांशी बेईमानी करत असून दिलेला कोणताच शब्द पाळत नाही. शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याप्रकरणी नवाब मालिकांसह दोषींवर हक्कभंग आणणार अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी घणाघात केला.

शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार गंभीर नसून, सरकार झोपलेला आहे की काय? अशा शब्दात मागील काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील सरकारला घरचा आहेर दिला होता. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी ज्या शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळाले असेल अशा सर्व शेतकऱ्यांना बियाणे बदलून देऊ अशा शब्दात खुद्द कृषीमंत्र्यांनी घोषणा केलेली असताना; एकाही शेतकऱ्याला बियाणे बदलून देण्यात आलेले नाही. त्याबदल्यात शेतकऱ्यांना आर्थिक मदत करू असेही कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.

त्या आदेशाला देखील बियाणे कंपन्या आणि महाराष्ट्र सरकारच्या बियाणे महामंडळाने केराची टोपली दाखवली आहे. राज्याच्या कृषीमंत्र्यांनी आदेश दिलेले असताना देखील बियाणे महामंडळाचे एमडी अद्यापही याबाबत गंभीर नसतील तर शासन शेतकऱ्यांच्या बाबतीत किती गंभीर आहे. ही बाब लक्षात येते असेही लोणीकर यांनी स्पष्ट केले आहे. जालना विभाग अंतर्गत जालना, औरंगाबाद, बीड, अहमदनगर, या चार जिल्ह्यात 27 हजार क्विंटल बोगस सोयाबीन बियाणे विक्री करण्यात आली आहे.

तर परभणी विभागांतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यांत अतर्गत 92 हजार क्विंटल बोगस सोयाबीन बियाणे विक्री करण्यात आली आहे. बियाणे महामंडळाचे अधिकारी व खासगी बियाणे कंपन्या नवाब मलिक व दादाजी भुसे हे दोन कॅबिनेट मंत्री व बच्चू कडू हे राज्यमंत्री असे तीन-तीन मंत्री बोलून देखील आदेशाला केराची टोपली दाखवत असतील तर सरकारचा अधिकार्‍यांवर किती वचक आहे. ही बाब स्पष्ट होत आहे असेही लोणीकर यावेळी म्हणाले.

अल्पसंख्यांक मंत्री तथा परभणी जिल्‍ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी आठ दिवसात ईगल कंपनीच्या मालकासह बियाणे महामंडळाच्या अधिकाऱ्यांना अटक करू अशी घोषणा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने परभणी येथे केली होती. परंतु ची घोषणा केवळ पोकळ घोषणा ठरली असून, नेहमीप्रमाणे यावेळी देखील शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला आहे दोषींना अटक करू या भूमिकेचे स्वागत करत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने परभणीत भर चौकात नवाब मलिक यांचा सत्कार करू असे प्रत्युत्तर दिले होते.

नवाब मलिक बोलल्याप्रमाणे वागतील आणि दोषींना अटक करतील अशा विश्वासाने लोणीकर यांनी स्वागताची जय्यत तयारी देखील केली होती परंतु दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी लोणीकर यांनी यावेळी केली. बोगस बियाणे प्रकरणी परभणी जिल्ह्यातील मर्डसगाव येथील शेतकरी विष्णू शिंदे व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी महादेव बिक्कड या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे सरकार अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याची वाट पाहत आहे. असा सवाल देखील लोणीकर यांनी यावेळी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button