breaking-newsमनोरंजन

डॉक्‍युमेंटरी फील देणारा “ओमेर्टा’

काळ्या पडद्यावर हेलावून टाकणाऱ्या मानवी किंचाळ्यांचा आवाजाने ओमेर्टाची सुरुवात होते. बॉस्निया आणि गुआनतानामाओमध्ये आपल्या बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराचा बदला घेण्याच्या उद्देशाने उमर ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स’ मधील आपले शिक्षण सोडून देतो आणि अतिरेकी बनतो. भारताचा बनावट पासपोर्ट, कागदपत्रे आणि ‘रोहित वर्मा’ हे नाव धारण करून उमर भारतात येतो. परदेशी पर्यटकांशी मैत्री करून त्यांचे अपहरण करणे आणि त्या बळावर आपल्या मागण्या मान्य करून घेणे हा त्यांचा नियोजित कट असतो. ठरल्यानुसार 1994 मध्ये उमर 4 विदेशी नागरिकांचे अपहरण करतो परंतु हा कट फसतो. उमरला पोलीस पकडतात, तिहारमध्ये डांबून ठेवतात, माहिती काढण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसात काठमांडूहुन दिल्लीला येणारे विमान अतिरेकी हायजॅक करतात आणि प्रवाशांच्या बदल्यात ओमरला सोडवून पुन्हा पाकिस्तानात नेतात. तिथे उमर आपल्या अतिरेकी कारवाया चालवतो आणि 2002 मध्ये वॉल स्ट्रीट जनरलचा पत्रकार, डॅनियल पर्लची अपहरण करून हत्या करतो. या गुन्ह्यात अमेरिकेच्या दबावामुळे त्याच्यावर खटला चालून मृत्युदंडाची शिक्षा होते. पुढे 26/11च्या हल्ल्याच्या वेळी उमर पाकिस्तानच्या तुरुंगातून बनावट सिम आणि नंबरच्या आधारे भारत आणि पाकिस्तानला युद्धाच्या गर्तेत ढकलायचा प्रयत्न करतो आणि चित्रपट थांबतो. चित्रपटात आपल्या बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराचा बदला घेण्याच्या तीव्र इच्छेने पेटलेल्या उमर, त्याच्यासारख्या तरुणांना भडकवणारे अतिरेकी, आयएसआय आणि अतिरेकी संघटनांचे साटेलोटे दाखवण्यात आले आहे. एकूणच संपूर्ण चित्रपटात उमरचा अतिरेकी बनण्याच्या प्रवास अधोरेखित केलेला आहे.

“ओमेर्टा’ ही एकाच वेळी चालणाऱ्या दोन कालखंडातील कहाणी आहे. चित्रपटातील फ्लॅशबॅक हा उमर सईद शेखची अतिरेकी बनण्याची सुरुवात तसेच ट्रेनिंग दर्शवतो तर दुसरा भाग त्याने अतिरेकी झाल्यावर केलेल्या घटनांचे वर्णन करतो. उमरची भूमिका राजकुमार रावने चांगल्या पद्धतीने निभावली आहे. मुख्य नायकाचे पात्र साकारताना प्रत्येक देशानुसार आणि पात्रानुसार भाषा बदलण्याचं कौशल्य कौतुकास्पद आहे. पाकिस्तानात असताना उर्दू, लंडनमध्ये इंग्लिश आणि भारतात हिंदी जागेला आणि देशाला साजेशी वापरली आहे. सिटीलाईट्‌स मधील झारखंडची “ग्रामीण हिंदी’ असो किंवा बरेली की बर्फीमधली “हरियाणी’ असो चित्रपटानुसार आणि पात्रानुसार भाषा आणि तिचा लहेजा बदलण्यात राजकुमार सराईत आहे. अतिरेक्‍यांची भूमिका करताना त्याची करारी नजर, कोणत्याही थराला जाण्याची तयारी, रागीट स्वभाव, देहबोली त्याने योग्यपणे साकारली आहे. आपल्या अभिनय कौशल्याने तसेच आव्हानात्मक भूमिका स्वीकारण्याच्या स्वभावामुळे राजकुमार प्रेक्षक आणि समीक्षकांच्या मनात घर निर्माण करत आहे. चित्रपतील संवादसुद्धा सीन्सला साजेसे आहेत. चित्रपटाचं बॅकग्राऊंड संगीत दृश्‍यांना अजून जिवंत बनवतं. अफगाणिस्तानमधली दृश्‍य उत्तम सिनेमॅटोग्राफीचा नमुना आहेत. ओमेर्टाची सर्वात जमेची बाजू म्हणजे चित्रपट संपूर्ण वेळ उमर सईद शेख या व्यक्ती भोवतीच फिरतो. काल्पनिक पात्र आणि कथा रचून चित्रपटाला आणखी मसालेदार बनवण्याची चूक केली गेली नाही याचं श्रेय नक्कीच हंसल मेहता यांना जातं. या सर्वांसोबत चित्रपटाच्या काही दुबळ्या- पडक्‍या बाजूसुद्धा आहेत. चित्रपटाची लांबी काही मिनिटांनी वाढवून उमरच्या पात्राला अजून रंगवता आलं असतं. तसेच बोस्नियामधील घटनांना अजून थोडा स्क्रीनटाईम दिला जाऊ शकला असता. चित्रपटाला साजेसा शेवट नसणं ही सर्व प्रेक्षकांची तक्रार असेल. बिअरपेक्षा दूध पिणारा, बुद्धिबळ खेळणारा, विलासी जीवनात न रमणारा उमर दाखवतानाच त्याची अतिरेकी मानसिकतासुद्धा दाखवता आली असती.

 

चित्रपटाला सत्याच्या शक्‍य तितक्‍या जवळ ठेऊन सरळ सोप्या कथेला प्रेक्षकांसमोर मांडण्यात दिग्दर्शकांना यश मिळालं आहे. हन्सल मेहता आणि राजकुमार राव या जोडीने “शाहिद’, “सिटीलाईट्‌स’, “बोस: डेड/अलाईव्ह’ या उत्तम कलाकृती केल्या आहेत आणि त्यात “ओमेर्टा’ची भर पडली आहे. हल्ली प्रेक्षकांना साधा आणि सत्यपरिस्थिती दर्शवणारा सिनेमा आवडतोय आणि प्रेक्षकांचा हाच ‘मूड’ मेहतांनी योग्यपणे पकडला आहे. म्हणूनच उत्तम अभिनय, साधी सोपी कथा, साजेसं दिग्दर्शन अनुभवण्यासाठी 90 मिनिट सीटला खिळवुन ठेवणारा ‘ओमेर्टा’ नक्कीच पाहायला हवा!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button