breaking-newsपिंपरी / चिंचवड

जांबे मारहाण प्रकरण; मारहाण झालेल्या इसमाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

जांबे:- जांबे येथील मारहाण प्रकरणात मारहाण झालेल्या इसमाचा हृदय विकाराच्या धक्क्याने आज (मंगळवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास मृत्यू झाला. यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आरोपींवर खुनाचा आणि अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या मागणीसाठी नातेवाईकांनी निगडी येथील रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले. पोलीस उप आयुक्त नम्रता पाटील यांनी नातेवाईकांची भेट घेऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले.

सुरेश अडसूळ (वय 52, रा. जांबे) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी सुशांत गायकवाड, धर्मराज गायकवाड, चैतराम गायकवाड, आदित्य शिनगारे (सर्व रा. जांबे, मुळशी) यांना अटक करण्यात आले आहे.

अडसूळ आणि गायकवाड कुटुंबियांचे खूप वर्षांपासूनचे जुने वाद होते. वादाचे भांडणात रूपांतर होण्यासाठी सुरेश यांचा मुलगा चिरायू याने त्याच्या व्हाट्सअप वर 20 सप्टेंबर रोजी ठेवलेले स्टेटस कारणीभूत ठरले. सर्व जुन्या वादांचा भडका होऊन ही भांडणे झाली. यामध्ये आरोपींची सुरेश आणि त्यांचा मुलगा चिरायू या दोघांना लाकडी दांडक्याने आणि तलवारीने मारहाण केली. यामध्ये दोघेजण जखमी झाले. भांडण झाल्यानंतर अडसूळ हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आले असता पोलिसांनी सुरुवातीला तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. फार वेळेनंतर तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांची जामिनावर सुटका देखील झाली. त्यानंतर सुरेश घाबरले होते. त्यातच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना उपचारासाठी तात्काळ निगडी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सुरेश यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे म्हणत रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आरोपींवर अॅट्रॉसिटी नुसार देखील गुन्हा दाखल करावा. तसेच गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करणा-या पोलीस अधिका-यांवर देखील कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली. दुपारी तीनच्या सुमारास पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील यांनी नातेवाईकांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button